नगरचे गुरुजी पुन्हा आरोपीच्या पिंजर्‍यात? | पुढारी

नगरचे गुरुजी पुन्हा आरोपीच्या पिंजर्‍यात?

नगरः पुढारी वृत्तसेवा : दिव्यांग असल्याचे बनावट दाखल घेऊन प्रशासकीय लाभ घेतलेल्या 76 गुरुजींवर 2012 मध्ये गुन्हे दाखल झाले होते. त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगस दिव्यांग आणि घटस्फोटित असल्याच्या दाखल्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. काही शिक्षकांनी संवर्ग एकमधून खोटे घटस्फोट व खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केल्याची एक तक्रार थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा निनावी अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाची पोहोच असल्याचे दिसते.

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली 2017 व 2022 करिता शासन धोरणामध्ये संवर्ग एक यांना विशेष प्राधान्य देण्यात येते. या गोष्टीचा फायदा घेऊन काही शिक्षकांनी त्यांच्या पत्नीचा घटस्फोट न्यायालयातून दाखवण्यापुरता घेतला व शासकीय बदली धोरणाचा वापर करून घेतला, तसेच काही शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले सादर केले आहेत. संवर्ग एकमधून बदली झालेल्या घटस्फोटित महिलांचे सीडीआर कॉल रेकॉर्ड तपासल्यास आपणास सर्व सत्य समोर येईल. तसेच ज्यांनी अपंगत्वाचे दाखले दिले आहेत, ते खरे की खोटे हे उघड होईल. विशेष म्हणजे घटस्फोटित महिला शिक्षकांनी बदलीसाठी त्यांच्या माहेरचा जिल्हा, तालुका न निवडता पतीचा तालुका निवडला, ही बाब विशेष आहे.

शिक्षकांनीच अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणे योग्य नाही. बहुतेक या शिक्षकांना असे दाखवून द्यायचे आहे, की आपण खोटी कागदपत्रे करून शासनाची फसवणूक सहज करू शकतो, याचे उदाहरणच त्यांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवले, ही अत्यंत गांभीर्याची बाब आहे. तरी आंतरजिल्हा बदलीमध्ये सन 2017 व 2022 संवर्ग एकमधून बदली झालेल्या व ज्यांनी खोटी माहिती दिली, अशा शिक्षकांची तपासणी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा 2023 च्या आंतरजिल्हा बदलीमध्येही सर्रास शिक्षक खोटे घटस्फोट दाखले, दिव्यांग दाखले जोडतील. परिणामी प्रामाणिक शिक्षकाला बदलीपासून वंचित राहावे लागेल, अशी भीतीही या अर्जातून व्यक्त केल्याचे दिसते. या अर्जासोबत संवर्ग एकमधून बदलीप्राप्त शिक्षकांची यादीही जोडली आहे.

‘त्या’ परितक्त्यांची चौकशी होणार?
घटस्फोटित असल्याचे खोटे दाखले घेऊन तसेच परित्यक्त्या असल्याचे दाखवून मागील काळात काही शिक्षकांनी जिल्ह्यांतर्गत बदलीसुद्धा करून घेतल्याचे समजते. या कामी त्यांना जिल्ह्यातील काही ‘तंत्रस्नेही शिक्षकांनी’ मार्गदर्शन केल्याचीही चर्चा आहे. काही शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केल्याचेही चर्चिले जात आहे.

‘त्यांची’ बदली करू नये! पोलिसांकडे यादी
संबंधित यादीतील ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत, अशा शिक्षकांच्या अर्जाची व त्यांच्या पुराव्याची शहानिशा झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, अशी मागणी काही शिक्षक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

हिंदी विषयाच्या बोगस पदव्यांची चौकशी
मध्यंतरी झालेल्या प्रमोशनमध्ये काही शिक्षकांनी हिंदी विषयाच्या खोट्या पदव्या सादर करून शासनाकडून लाभ घेतल्याची बाब उघड झाली आहे. त्या विरोधात आता थेट शिक्षण आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून सदरचे प्रकरण चौकशीसाठी लवकरच जिल्हा परिषदेकडे येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

 

Back to top button