

संगमनेरः पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील विविध 10 गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या पाठपुराव्यामुळे 26 कोटी 60 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला. विधी मंडळ अधिवेशनात राज्य सरकारने मंजुर केलेल्या पुरवणी मागण्यांच्या निधीतून या निधीस मान्यता मिळाली. संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा ते वडगाव फाटा या राज्य मार्ग 50 च्या मजबुतीकरण व डांबरीकरणास 60 लाख, शारदा बेकरी ते गुंजाळवाडी बायपास पुल रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणास 25 लाख, मेडिकअर हॉस्पीटल ते गुंजाळवाडी रस्त्यास 35 लाख, वेल्हाळेरोड आडवाट ते अठरापगड वस्तीपर्यंत रस्त्यास 20 लाख, राष्ट्रीय महामार्ग 60 ते मालदाडपर्यंत रस्त्यास 3 कोटी, पिंपळगावदेपा ते अंभोरे या रस्त्यास 4 कोटी, निमगाव बु. ते शिरसगाव धूपे, कोठेवाडी ते जवळेबाळेश्वर रस्ता 6 कोटी, डिग्रस, अंभोरे, जाखुरी, निमगावटेंभी, हिवरगाव पावसा, झोळे, मिर्झापूर, पेमगीरी येथून जाणार्या रस्त्यांकरीता 1 कोटी 20 लाख, राष्ट्रीय महामार्ग 60 ते हिवरगाव पावसा रस्त्यास 2 कोटी, राष्ट्रीय महामार्ग 60 ते चंदनापूरी, पिंपळगाव माथा, जवळे बाळेश्वर रस्त्यास 6 कोटी 50 लाख, बाळेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्यास 2 कोटी 50 लाख रुपये निधी मंजुर झाला.
पालकमंत्री विखे पा. यांच्या माध्यमातून सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सा. बांच्या माध्यमातून शासनाकडे सादर केले होते. रस्त्यांच्या कामाला सरकारने निधी उपलब्ध करुन दिल्याने कामाचा मार्ग मोकळा झाला. ग्रामीण भागात सर्व रस्ते शहरातून जाणार्या राष्ट्रीय व राज्य मार्गाला जोडल्यामुळे गावांमधून नागरीकांची वर्दळ सतत सुरु असते. शेती उत्पादीत माल गावामध्ये घेवून येण्यासाठी रस्त्यांची मोठी अडचण लक्षात घेवून ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी या रस्त्यांच्या कामास निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री विखे यांच्याकडे केली होती.
निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले.