

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : विक्रीसाठी कांद्याच्या गोण्या टेम्पोत टाकत असताना कांद्याची एक गोणी अंगावर पडल्याने शेतकर्याचा मृत्यू झाला. नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे गुरुवारी (दि. 7) सकाळी ही दुर्घटना घडली. भाऊसाहेब ऊर्फ नाथा धर्मा गोरे (वय 45, रा. रुईछत्तीशी, ता. नगर) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. मृत भाऊसाहेब गोरे यांनी शेतातील कांदा गोण्या गुरुवारी (दि. 7) नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये नेण्यासाठी टेम्पो बोलावला. सकाळी सहा वाजता ते कांदा गोण्या टेम्पोत टाकताना त्यांना चक्कर आली. त्यांच्या डोक्यावरील कांद्याची गोणी त्यांच्या अंगावर पडून ते बेशुद्ध पडले. त्यांचे चुलतभाऊ प्रवीण गोरे यांनी त्यांना तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, सकाळी 7.20 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यामागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुली, एक मुलगा असा परिवार आहे.