..तर राजकारण सोडून देईन ; अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे राजळे कुटुंबावर टीकास्त्र

..तर राजकारण सोडून देईन ; अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे राजळे कुटुंबावर टीकास्त्र
Published on
Updated on

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  एका घराण्याभोवती गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तालुक्याचे राजकारण सुरू असताना कोणतेही भरीव काम या तालुक्यात झाले नाही. लोकांचा जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात एक तलाव तालुक्यात निर्माण केला असेल तर मी राजकारण सोडून देतो, असे आव्हाण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांनी नामोल्लेख टाळत राजळे कुटुंबासह आमदार राजळेवर टीकास्त्र सोडले.

तालुक्यातील करोडी येथे पाथर्डी बीड राज्यमार्गावर टाकळीमानूर ते करोडी रस्ताकाम सुरू करा आणि महावितरणचा कारभार सुधारावा या प्रमुख मागणीसाठी अ‍ॅड. ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला. त्यावेळी ढाकणे यांनी राजळे कुटुंबावर शरसंधान साधले. बाजार समितीचे माजी सभापती गाहिनाथ शिरसाट यांच्या नियोजनातून झालेले रस्ता रोको आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख भगवान दराडे, शिंदे गटाचे तालुका प्रमुख विष्णूपंत ढाकणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, पांडुरंग शिरसाठ, डॉ राजेंद्र खेडकर, सिताराम बोरुडे, वैभव दहिफळे, सतिश मुनोत, बाळासाहेब गर्जे, अर्जुन धायतडक, अजित शिरसाट, राजेंद्र नांगरे, महादेव दहिफळे, अप्पा शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, उध्दव दुसुंग, सुरेश बडे उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींचे काम काय?, असा सवाल ढाकणे यांनी उपस्थित केला. पिढ्यानपिढ्या लोककल्याण होईल असे कोणतेही पाण्यासाठीचे तलाव निर्माण केलेले काम दाखवा, मी राजकारण सोडून देतो. ढाकणे हे नाव दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी याच परिसरातील टाकळीमानुर भागाने मोठी मदत केली आहे. त्यामुळे मला हा परिसर विसरता येणार नाही. या भागातील तलाव आणि मुळे रस्ते हे स्व. बबनराव ढाकणे यांनी त्यांच्या काळात निर्माण केले. तालुक्याला 1968 सली प्रथम विज आणण्याचे काम केले. पाणी साठवण्यासाठी भरीव काम स्व ढाकणे यांनी केल्यामुळेच पाऊस पडल्यानंतर या भागात पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

असे महत्त्वपूर्ण निर्णय कामे स्व. ढाकणे यांच्या काळात झाली ती आत्ताच्या काळात नाही. ज्या कुटुंबाने पंचवीस वर्ष सत्ता भोगली त्यांनी लोकांचे कायमस्वरूपीचा प्रश्न सोडले जातील असे प्रकल्प उभे केले नाही. शेतकर्‍यांच्या पिकाला भाव, आरक्षण, नोकर्‍या, दूध दरवाढ, खाजगीकरण अशा अनेक विचित्र परिस्थितीतून आपण जात असताना लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे सरकार जाणून-बुजून बगल देत आहे. करोडी ते टाकळी या रस्त्याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे मागणी केली होती. आजही या रस्त्याच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वियसहाय्यक यांच्याशी बोलणे झाले.

त्याला मंजुरी मिळणार असून दोन दिवसात या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. अन्यथा हे काम दहा दिवसांच्या आत सुरू न झाल्यास मी एकटा या रस्त्यावर आंदोलन करणार आणि हा रस्ता खोदून पूर्ण रस्ता बंद करणार असा इशारा ढाकणे यांनी प्रशासनाला दिला आहे. तहसीलदार श्याम वाडकर आल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आठवडे बाजार असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टक्केवारी… त्यज्ञांना लाखलाभ!
रस्ता चांगला झाला पाहिजे यासाठी लोकांनी लक्ष द्यावे, सध्या रस्ते कशी होतात तुम्हाला माहित आहे, असे ढाकणे म्हणताच येथील एका आंदोलकांनी टक्केवारी घेतली जाते असे उत्तर दिले. त्यावर ढाकणे म्हणाले की, जो टक्केवारी घेतो त्याला लखलाभ.. त्याचं कल्याण होवो, ते कसं कल्याण होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.

लोकप्रतिनिधी हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्या नावावर मतदान घेतात, नंतर विकासापासून आम्हाला वंचित ठेवतात, हा प्रकार पंकजा मुंडे यांच्या कानावर हा घातला पाहिजे. निवडणुकीचे काळात विकासाचे अकराशे-बाराशे कोटीचे आकडे यांनी लोकांना दाखवले, हे एवढे पैसे आणतात कुठून? हा आकडा लिहायचा म्हटलं तरी अंगावर काटा येतो.
                                            – शिवशंकर राजळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष

जिल्हा परिषद सदस्य एकदा मत घेऊन निवडून गेले की तोंड सुद्धा दाखवत नाही. या परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या खोल्यांचा प्रश्न, रस्ते अशा विविध प्रश्नावर खासदार, आमदार व जिल्हा परिषदेचे सदस्य यांची प्रचंड उदासीनता आहे. या भागातील लोकांचे मते चालतात मात्र त्यांचे काम नको. या लोकप्रतिनिधींनी या परिसरातील लोकांचा विश्वासघात केला आहे.
                                – गहिनीनाथ शिरसाट, बाजार समितीचे माजी सभापती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news