

नगर : संघटित गुन्हेगारी आणि झोपडपट्टी दादाची दहशत मोडीत काढण्यासाठी एलसीबी अॅक्टिव मोडवर आली आहे. दोन वर्षात संघटित गुन्हेगारांच्या 11 टोळ्या मोक्क्यांतर्गत जेलमध्ये टाकल्या. शस्त्राच्या जोरांवर सामान्यांवर दादागिरी करणार्या 18 भाईंची दशहत मोडीत काढीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. गुन्हेगारी विश्वातील संघटित गुन्हेगारीला मूळपासून संपविण्यासाठी केंद्राच्या टाडा कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये राज्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) पारीत झाला. त्यातून संघटित गुन्हेगारी करून सामान्य माणसावर दहशत निर्माण करणार्यांना काहीअंशी प्रतिबंध झाला.
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत विविध गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई झाली आहे. त्यात गाजलेल्या कोठेवाडी प्रकरण, पांगरमल दारूकांड अशा गुन्ह्यात मोक्का कारवाई झालेली आहे. अलीकडच्या दोन वर्षांत स्थानिक गुन्हे शाखेने 11 टोळ्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली. यंदाच्या वर्षात श्रीरामपूर तालुक्यातील पाप्या शेख याच्यासह दहा जणांच्या टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना खंडणी मागिल्याचाही गुन्हा दाखल आहे. राहुरी तालुक्यातील योगेश खरात याच्यासह दहा जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. व्यापार्याचे अपहरण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल आहे. नगर तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार विश्वजित कासार याच्यासह चार जणांविरोधात मोक्का लावण्यात आला आहे. खून, लूट, फसवणूक असे विविध गुन्हे विश्वजित कासार टोळीविरुद्ध दाखल आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगार व संघटित गुन्हेगारी करणार्यांच्या गुन्ह्याची शोध मोहीम सुरू आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
18 झोपडपट्टीदादांना जेलची हवा
नगर शहरसह जिल्ह्यात विविध भागामध्ये शस्त्रांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांवर दशहत निर्माण करणारे झोपडपट्टीदादा व वाळू तस्करी करणार्यांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याच्या (एमपीडीए) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी सराईत आरोपींच्या गुन्ह्यांची जंत्री शोधण्याचे काम सुरू आहे. पुढील काळात आणखी काळी टोळ्यांवर मोक्का नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. दहशत निर्माण करणार्यांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
– दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा