

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खडका शिवारात तरूणाच्या हत्येप्रकरणी महिलेसह तिचा पती व भावावर नेवासा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेसह तिच्या पतीला अटक करण्यात आली असून, त्यांना नेवासा न्यायालयाने 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एक जण फरार आहे. रामेश्वर रामचंद्र कोरडे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. मयत रामेश्वरचे वडील रामचंद्र किसन कोरडे (रा.पुरुषोत्तमपुरी, ता.माजलगाव, जि.बीड) यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अश्विनी विशाल बोराटे, विशाल बोराटे (दोघे रा. वरखेड ता.नेवासा) व अविनाश सुरेश घटे (रा. इंदापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित बातम्या :
रामेश्वर कोरडे व अश्विनी बोराटे यांची ओळख होती. शनिवारी (दि.2) रामेश्वर कोरडे हा नवीन पिकअप बांधणीच्या कामासाठी वडील रामचंद्र कोरडे यांच्या सोबत नाशिकला गेला होता. पैसे कमी पडल्याने तो रविवारी (दि.3) सकाळी बीडला गेला. त्याने दुपारी दोनच्या सुमारास वडीलांना निम्म्या रस्त्यात आल्याचे फोन करून सांगितले. परंतु, दुपारी चारच्या सुमारास अश्विनी हिचा भाऊ अविनाश याने त्याच्या वडिलांना फोन केला. रामेश्वरला नेवाशात पकडल्याचे अविनाशने त्यांना सांगितले. त्यास इंदापूर येथे घेऊन जात असल्याचेही तो म्हणाला. त्यावर रामेश्वरला मारहाण करू नका. नेवाशाला येतोय, असे त्याचे वडील रामचंद्र यांनी अविनाशला सांगितले.
त्यानंतर वडील रामचंद्र यांनी पुन्हा फोन केला असता, विशाल बोराटे याने फोन घेतला. त्यावेळी मारहाणीचा आवाज येत असल्याचे रामचंद्र कोरडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर रात्री सातच्या सुमारास रामेश्वरला सोडून दिल्याचे अविनाशने रामेश्वरच्या वडिलांना सांगितले. रात्री साडेसातच्या सुमारास रामचंद्र कोरडे यांना कोणी तरी फोन केला. खडका शिवारातील एका हॉटेलमागे तुमचा मुलगा पडलेला असून, तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगितले. त्यानंतर रामेश्वर यास नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
रामचंद्र कोरडे यांच्या फिर्यादीवरूर हत्येचा गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात अधिक तपास करीत आहेत.
अश्विनीचा भाऊ अविनाश घटे याने मयत रामेश्वर यास यापूर्वीही मारहाण करून पळवून नेले होते. याबाबत सहा महिन्यांपूर्वी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याचे मयताचे वडील रामचंद्र कोरडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.