अकोलेत शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय | पुढारी

अकोलेत शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अनेक वर्षापासून अकोले तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने महायुती सरकारने 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन 100 बेडची व्यवस्थेमुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोई सुविधा मिळणार आहेत. अकोले तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र 10 तर 72 उपकेंद्रे असून सुमारे अडीच लाख जनतेची आरोग्यसेवा या केंद्रावर अवलंबून आहे. आदिवासी भागातील मोलमजुरी करणार्‍या सर्वसामान्य कुटुंबियांना मजुरी बुडवून शहरात उपचार घेणे परवडत नसल्याने या आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. परंतु अकोले तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे.

तर आरोग्य कर्मचार्‍यांना मुख्यालयाच वावड असल्याने रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्र, उपकेंद्राना कुलूप असल्याचा प्रत्यक्ष अनुभव रुग्णांना येत आहे. तालुक्यात राजूर, समशेरपुर, कोतूळ, अकोले या चार ग्रामीण रुग्णालये आहेत. अकोल्यात फक्त 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय असुन फक्त 30 खाटा, 10 कर्मचारी, 1 रूग्णवाहिका, 2 डॉक्टरावर सध्या सरकारी दवाखाना सुरु आहे. त्यामुळे, गेली कित्तेक वर्षे तालुक्यातील जनता आरोग्याच्या समस्यांना तोंड देत होती. उपजिल्हा रुग्णालयासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने महायुती सरकारने 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, भुलतज्ज्ञ, एमडी मेडिसिन, एक सर्जन, एक स्त्रीरोगतज्ञ, 15 मेडिकल ऑफिसर, कर्मचारी, आयसीयु कक्ष, स्केक बाईट कक्ष, सर्जरी विभाग, महात्मा फुले योजना अंतर्गत सोईसुविधा तसेच 100 बेडची व्यवस्था, यांसह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यामुळे, उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर अकोले तालुक्यातील आरोग्याची सुविधा सुटणार आहे. तसेच सध्याची इमारत पाडून त्याचे निर्लेखन केले जाईल आणि नव्याने इमी उभारली जाईल. त्यासाठी पहिला हाप्ता म्हणून 10 कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात 37 कोटी 85.11 लक्ष रुपये दिले जाणार आहेत. ही दोन मजली इमारत असेल, 7326.48 चौरस मिटरचे बांधकाम असून त्याचा दर 28 हजार असणार आहे. हा प्रस्ताव 2022-23 मधील असेल, त्यासाठी सर्व मंजुर्‍या घेणे बंधनकारक असेल, या कामाचे तुकडे न पाडता निविदा एकसंघ होणार असल्याचे शासनाच्या आदेशात नमुद केले आहेत. आदिवासी भागात सुसज्य रुग्णालय होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मला आमदार म्हणून आत्तापर्यंत जे 4 वर्षे मिळाले, त्यात मी 40 वर्षांची तुलना करु शकतो, इतके काम मी केले आहे. मात्र, ज्यांना काविळ झाली आहे, ते लोक सोडून तालुक्यातील भोळी भाबडी जनता विकास अनुभवत आहे. गेल्या 40 वर्षांतील हा बॅकलॉक भरुन काढणे माझ्यासाठी फार मोठे आव्हान होते. तो भरुन काढण्याचा प्रयत्न मी 70 ते 80 टक्के अल्पकाळात केला आहे. अकोल्यात उपजिल्हा रुग्णालयाचा साधा प्रस्ताव देखील 40 वर्षांमध्ये कोणी दाखल केला नव्हता, परंतु मी सर्व नव्याने सादर करुन त्याला मंजुरी आणली. यात अजित दादांचे फार मोठे योगदान आहे.
                                                           – आ. डॉ. किरण लहामटे, अकोले

Back to top button