कुत्र्यामुळे सापडले डॉक्टरांचे 550 ग्रॅम सोने | पुढारी

कुत्र्यामुळे सापडले डॉक्टरांचे 550 ग्रॅम सोने

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील माणिकनगर येथील डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरातून 55 तोळ्यांचे दागिने चोरीला गेले. कोतवाली पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा तपास आरोपीपर्यंत घेऊन गेला. कुत्रे विकत घेण्यासाठी आरोपी राहुरी बसस्थानकावर आला अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कोतवाली पोलिसांनी आरोपी दीपक सर्जेराव पवार (वय 32, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून 550 ग्रॅम सोने जप्त केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरातून 23 आणि 28 ऑक्टोबरच्या दरम्यान 55 तोळे सोन्याचे दागिने, हिरे, पुष्कराज, मोती आणि पाचू असे दागिने चोरीला गेले होते. याबाबत डॉ. फिरोदिया यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सीसीटीव्हीमुळे महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले. तपास राहुरीतील दीपक पवार याच्याभोवती फिरू लागला. पोलिसांनी दीपकला राहुरी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरी केलेले बरेच सोने घरी असून काही सोने सेलू (परभणी) येथे दोन सराफांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी परभणी येथील सराफ आणि दीपकच्या घरातून सुमारे 33 लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने (एकूण 828 ग्रॅम; निव्वळ सोन्याचे 550 ग्रॅम) जप्त केले आहे. दीपक पवार याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी आव्हानात्मक गुन्ह्याची उकल केल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी तपास पथकाला 35 हजारांचे बक्षीस जाहीर केले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, पोलिस जवान तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पितळे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अभय कदम, शाहीद शेख, अमोल गाडे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, लोणी पोलिस ठाण्याचे रवींद्र मेढे, मोबाईल सेलचे राहुल गुंड यांच्या पथकाने केली.

डॉक्टरांच्या घरात दोन वेळा चोरी
आरोपी दीपक पवार याने डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरात दोन वेळा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालेे. सुरुवातीला घड्याळ आणि रोख रक्कम चोरले होते. त्यानंतर दागिन्यांची चोरी केली. कपाटाचे लॉकर खोलण्यासाठी त्याने तब्बल अडीच तास घेतले. मात्र, चोरी डाव यशस्वी केला. सीसीटीव्ही फुटेजमुळे दीपक पवार याच्या वर्णनाच्या बारा व्यक्तींची चौकशी केली. शेवटी दीपक पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

70 ठिकाणी दीडशे सीसीटीव्हीची तपासणी
गुन्ह्यानंतर तपासात सुरुवातीला आरोपीचे धागेदोरे मिळत नव्हते. परंतु, बारकाईने तपास केल्यावर 3 सेकंदांचे सीसीटीव्ही फुटेजमुळे दीपक पवार भोवती संशय बळावला. त्यासाठी कोतवाली पोलिसांनी नगर शहर, श्रीरामपूर, राहुरीतील 70 ठिकाणचे सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेर्‍यामधील चित्रीकरण तपासले. यानंतर दीपक पवार याच्यापर्यंत पोलीस पोहोचले.

Back to top button