Nagar : जनावरांसह सातशे किलो गोमांस जप्त | पुढारी

Nagar : जनावरांसह सातशे किलो गोमांस जप्त

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कत्तलखान्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नेवासा पोलिसांनी रविवारी (दि.3) पहाटे कत्तलीसाठी आणलेल्या 27 गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस, असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना पोलिसांच्या ताब्यात घेतले. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अतुल लोटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैफ मुस्ताक शेख (वय 19), रफिक नूरमहंमद शेख (वय 45), रियाज कादर चौधरी (रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा), राजू अकबर कुरेशी (वय 30, रा. सिल्लेखाणा औरंगाबाद) यांच्यासह एक अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोवंश जनावरे डांबून गोमांस विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस उपनिरीक्षक मनोहर शेजवळ व पथक, नेवाशाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे व स्थानिक पोलिस व दोन पंचांना सोबत घेऊन शहरातील नाईकवाडी मोहल्ल्यात रविवारी (दि.3) पहाटे छापा टाकला. यावेळी तेथे पाचजण गोमांसासह आढळले.

हा कत्तलखाना कैफ मुस्ताक शेख चालवित असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये 27 गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे आढळले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही जनावरे तीन टेम्पोतून नेवासा पोलिस ठाण्यात आणण्यात आली.
1 लाख 40 हजार किंमतीचे सातशे किलो गोमांस, तसेच 2 लाख 70 हजार किंमतीची लहान मोठी जनावरे असा सुमारे 4 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नेहमीच कत्तलखान्यावर छापे!
या कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांकडून नेहमीच छापासत्र टाकण्यात येत आहेत. गुन्हेही दाखल होतात. कारवाई होते. पंरतू येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद होत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

Back to top button