पावसाची ‘अवकळा’..कही खुशी, कही गम !

पावसाची ‘अवकळा’..कही खुशी, कही गम !
Published on
Updated on

नगर तालुका : तालुक्याला गुरूवारी (दि.30) रात्री झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात जेऊर मंडळात सर्वाधिक पाऊस झालो. काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान होणार असून, जिरायत भागातील ज्वारी व इतर चारा पिकांना फायदेशीर ठरणार्‍या पावसाने 'कही खुशी, कही गम' असे वातावरण तयार झाले आहे.
पावसाळ्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पिकांची वाताहात झाली. उत्तरा नक्षत्रात झालेल्या कमी-अधिक स्वरूपाच्या पावसामुळे रब्बी हंगामातील सुमारे 80 टक्के क्षेत्र लागवडीखाली आले होते. गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, चारा पिके जोमात होती. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, धुके व अवकाळी पावसाची हजेरी, यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वातावरणातील बदलाचा सर्वच पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील 11 मंडळामध्ये गुरूवारी रात्री सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. कांद्याची शेतातच सड होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पावसाळ्यात तालुक्यातील बहुतांशी मोठे तलाव, बंधारे, नाले, नद्यांना पाण्याचा स्पर्श झाला नाही. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावत होती. अनेक भागांत रब्बी पिकांना पाण्याचा तुटावडा जाणवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे जिरायत पट्ट्यातील ज्वारी व इतर चारा पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे झालेला पाऊस हा काही शेतकर्‍यांसाठी फायदेशीर, तर काहींसाठी नुकसानदायक ठरत आहे.

गर्भगिरीच्या डोंगर रांगांमधील चारा देखील सुकू लागला होता. पावसाच्या सुरुवातीला वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांना देखील पावसाचा फायदा होणार आहे. डोंगर परिसरात गवत हिरवेगार होणार असून, काही अंशी चार्‍याचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्यास चित्र दिसून येत आहे. जेऊर मंडलात झालेला पाऊस कांदा उत्पादक शेतकरी वगळता सर्वांसाठीच दिलासा देणाराच ठरणार आहे.
तालुक्यात 17 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालेली आहे. गहू दोन हजार हेक्टर, कांदा दहा हजार हेक्टर क्षेत्रावर, तर हरभर्‍याची पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तालुक्यातील बहुतांशी भागात पाण्याचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झालेली आहे. पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिके निघतील की नाही, याची शाश्वती नाही. अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान होणार असले तरी ज्वारी व इतर चारा पिकांसाठी झालेला पाऊस फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे नगर तालुक्यात अवकाळी पाऊस काही प्रमाणात नुकसानकारक, तर काही ठिकाणी दिलासा देणारा ठरणार आहे.

मंडलनिहाय पाऊस (मिलीमीटर)
नालेगाव 26.8, सावेडी 57, कापूरवाडी 39.8, केडगाव 45.5, भिंगार 15, नागपूर 16.5, जेऊर 55.5, चिचोंडी 23.5, वाळकी 16.3, चास 51.3, रुईछत्तीसी 14.3

जेऊर परिसरात पावसाळ्यात पाठ फिरविली. सध्या जनावरांचा चारा व पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाने ज्वारी व चारा पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
                                                       – बाळासाहेब तवले, शेतकरी, जेऊर.

कांदा, गहू, मका लागवड केली असून, पाणी पुरण्याची शक्यता कमी आहे. बदलत्या वातावरणाने पिकांवर रोग पडला आहे. दोन वर्षांपासून शेती तोट्यात असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
                                                    – नीलेश कासार, शेतकरी, वाळकी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news