

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रकल्पांसाठी पाटबंधारे विभागाने संपादित केलेल्या शेतजमिनींचे पैसे न दिल्यास, कालवे बुजविण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. तालुक्यातील रूई गव्हाण व भोसा येथील कुकडी डावा कालवा व भोसेखिंड प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र या शेतकर्यांना संपादित जमिनींची वाढीव नुकसान भरपाई दावे मंजूर होऊनही व न्यायालयाने आदेश देऊनही मिळाली नाही. वारंवार मागणी करूनही शेतकर्यांना पैसे दिले जात नाहीत. यामुळे या परिसरातील सर्व शेतकर्यांनी गुरूवारी थेट पाटबंधारे विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता कापोले यांचे कार्यालय गाठले.
त्यांना यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते लालासाहेब सुद्रिक, अनिल चव्हाण, शरद जामदार, अमोल आमदार, प्रकाश जामदार, अरूण बुरंगे, बापूराव नवले, राजेंद्र जामदार, कार्तिक जामदार, भगवान जामदार, नवनाथ मेरगळ हे प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्यांनी रूई गव्हाण व भोसा या दोन परिसरातील शेतकर्यांच्या संपादित करण्यात आलेल्या जमिनी आणि त्याचा मिळणारा मोबदला याविषयी अधिकार्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी अधिकार्यांनी या प्रश्नावर आठ दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शेतकर्यांच्या शिष्टमंडळाला दिले. पाटबंधारे विभागाने शेतकर्यांचे पैसे न दिल्यास 29 डिसेंबरपासून या परिसरातील कुकडी कालवा बुजवून सपाटीकरण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे लालासाहेब सुद्रिक यांनी दिला आहे.