

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हार घोटी राज्य मार्गावरील वडगाव पान ते समनापूर दरम्यान आजु उर्फ अजीम अन्वर पठाण, (वार्ड नंबर १ मिल्लतनगर, श्रीरामपूर) याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन राऊंड मिळून आले आहेत. त्यास पोलिसांनी पकडून त्यास गजाआड केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या शनीशिंगणापूर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी बंदोबस्ताच्या अनुषंगाने हद्दीतील हॉटेल लॉजेस चेकिंग व नाकाबंदी करत असताना वडगावपान ते समनापूर दरम्यानच्या कोल्हार घोटी राज्यमार्गावर एक संशयित इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन राऊंड असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना समजली. त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सॅलोमन सातपुते, पो कॉ राजेंद्र डमाळे, राहुल डोके, विशाल सारबंदे यांनी त्या इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता पठाण याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन राऊंड मिळून आले.