म. फुले विद्यापीठप्रकरणी आ. तनपुरेंची धाव ! | पुढारी

म. फुले विद्यापीठप्रकरणी आ. तनपुरेंची धाव !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  म. फुले कृषी विद्यापीठातील गैरकारभाराविरोधात अखेर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेत ठेकेदार, कंत्राटी कर्मचार्‍यांसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्‍यांची आज संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, ठेकेदारांची अडवणूक करीत थकीत बिलांसह कंत्राटी कर्मचार्‍यांवर झालेला अन्याय पाहता आ. तनपुरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दै. पुढारीने विद्यापीठामधील गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्याने अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी कारभार हाती घेतल्यापासून कोणत्या न कोणत्या वादामुळे राज्यभर चर्चा होत आहे. विद्यापीठातील नियंत्रक, कुलसचिवसारख्या पदांवरील क्लास वन अधिकार्‍यांवर कारवाई झाल्यानंतर कंत्राटी कर्मचार्‍यांना थेट ‘चले जाव’, चा आदेश देण्यात आला. यानंतर विद्यापीठातील बांधकाम विभागातील अनेक कामांमध्ये शासकीय नियम धाब्यावर बसवत कोट्यवधी रूपयांची झालेली उधळपट्टीची चर्चा झाली.

दरम्यान, विद्यापीठातील बांधकाम विभागाने नुकतेच काही कोट्यवधी रूपयांची कामे करताना केलेला गलथान कारभार एका सामाजिक कार्यकर्त्याने घेतलेल्या माहिती अधिकारात उघड झाला आहे. ‘एमडी’ नावाच्या सिव्हील इंजिनिअर्स फर्मच्या नावे चक्क इलेक्ट्रीकल कामाचा ठेका देत बिल अदा करण्यात आले आहे. राहुरी हद्दीत फरशी बसविण्याचे काम करणार्‍या एका कामगाराच्या नावे 15 हजार रूपये किंमतीच्या गाद्या खरेदी, उशी, बेडशीट असे एकूण 2 लक्ष 55 हजाराचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. त्याच कामगाराकडून स्क्रू, वॉटर प्रूफ, कलर, खडी, वारनेस, पीव्हीसी दरवाजे, सनमाईक, लॅमिनेट आदी साहित्य लाखो रूपयांच्या किमतीत खरेदी करण्यात आले आहे. तसेच त्याच कामगाराकडून तिसर्‍या निविदेमध्ये वाळू, खडी, सिमेंट खरेदी करीत 2 लक्ष 57 हजाराचे बिल अदा केल्याचे दिसत आहे. शहरातील एक प्लंबींग मटेरीयल विकणार्‍याच्या नावेही वाळू, वीट, सिमेंटचे बिल अदा करण्यात आले आहे. शहरात रंग विकणार्‍या एका ट्रेडर्स दुकानदाराकडूनही विटा, वाळू सिमेंट खरेदी केल्याचे दाखवित बिल अदा केलेले आहे. राहुरी फॅक्टरी येथील एका पुंड नामक महिलेकडून सुमारे 15 हजार रूपये किमतीच्या 4 खुर्च्या, 40 हजाराचा सोफा, तसेच टी टेबल, बेड साईज टेबल खरेदी दाखवित 2 लक्ष 89 हजारांचे बील अदा केल्याचे दर्शविले आहे. दुसर्‍या एका कामात त्याच पुंड महिलेकडून ब्लीचींग पावडर, पेंट, सिमेंट, व्हाईट सिमेंट, खिळे असे 2 लक्ष 39 हजार रूपये बिल संबंधित महिलेला अदा केले आहे. त्यानंतर विशेष म्हणजे त्याच महिलेच्या नावे गवत खुरपणे, काट्या काढणे या याकामासाठी तब्बल 2 लक्ष 65 हजाराचे बिल काढण्यात आले आहे. अशाच पद्धतीने कोणताही ताळमेळ न ठेवता बांधकाम विभागामध्ये शासकीय ठेकेदाराची परवाना, जीसएसटी किंवा शासनाची रॉयल्टीबाबत कोणतेही कागदपत्रांची पाहणी न करता अनेक कोट्यवधी रूपयांची बिले बिनधास्तपणे वाटप केले जात असल्याचे आता उघड बोलले जात आहे.
हासर्व प्रकार करीत असताना बोटावर मोजण्या इतक्याच ठेकेदारांवर मेहेरबानी करीत अनेक ठेकेदारांना बील मंजूर करण्यासाठी खेट्या मारण्यास सांगितले जात आहे. तसेच विद्यापीठामध्ये प्रवेशालाही बंधन असल्याने संबंधित ठेकेदारांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी गलथान कारभाराची माहिती बाहेर देतात या शंकेवरून अनेकांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. हासर्व प्रकार पाहता अखेर ठेकेदारांनी एकत्र येत विद्यापीठ प्रशासनाविरोधात लढा घेतला. विद्यापीठात सुरू असलेला गैरकारभार दै. पुढारीने चव्हाट्यावर आणताच आ. प्राजक्त तनपुरे यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली. म. फुले कृषी विद्यापीठ येथे कुलसचिव, नियंत्रक,विद्यापीठ अभियंत्यांसह अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. यावेळी ठेकेदार, कंत्राटी कर्मचारी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे आ. तनपुरे प्रयत्न करणार असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

बैठक होऊ नये म्हणून मर्जीतच्या ठेकेदारांचा प्रयत्न
विद्यापीठात काही ठेकेदारांना अभय मिळते तर अनेकांवर अन्याय होतो. ही बाब आमदार तनपुरेंपुढे उघड होऊ नये म्हणून काही मर्जीतल्या ठेकेदारांनी बैठक होऊ नये म्हणून प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याबाबत कुलगुरू, विद्यापीठ अभियंता यांबाबत आमदार तनपुरे हे आज काय भूमिका घेणार? ठेकेदारांचे थकीत बिले मिळणार का? काढून टाकलेल्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Back to top button