

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारी (दि. 26) झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्याचा फटका 8 हजार 571 हेक्टरवरील विविध पिकांना बसला. केळी, द्राक्ष, ज्वारी, टोमॅटो, कापूस आणि भात अशा पिकांचा त्यात समावेश आहे. त्यात पारनेर तालुक्यातील सर्वाधिक 7 हजार 459 हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात एका बैलासह 9 जनावरांचा या पावसात मृत्यू झाला, तसेच 25 घरांची अंशत: पडझड झाली. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी अनेक भागांत शेतकर्यांना या पावसाचा दिलासादेखील मिळाल्याचे सांगण्यात आले.
जामखेड, कर्जत व श्रीगोंदा हे तालुके वगळता उर्वरित अकरा तालुक्यांना रविवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. संगमनेर तालुक्यात सरासरी 50.5 मि.मी. पाऊस झाला. त्याखालोखाल अकोले तालुक्यात 46.2, तर श्रीरामपूर तालुक्यात 46 मिलीमीटर नोंद करत पावसाने थैमान घातले. गारपीट आणि अवकाळी पावसाने ज्वारी, कापूस, कांदा या पिकांबरोबरच द्राक्ष, पेरू, डाळिंब, बोर यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.
पारनेर तालुक्यात सरासरी 39.1 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसाने तालुक्यातील 7 हजार 459 हेक्टर क्षेत्रावरील केळी, कांदा, द्राक्ष, ज्वारी, टोमॅटो, डाळिंब व बोर या पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यातील 24 गावांतील 12 हजार 100 शेतकर्यांना या वादळी पावसाचा व गारपिटीचा फटका बसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
त्याखालोखाल अकोले तालुक्यातील 60 गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. या तालुक्यातील 927 हेक्टर क्षेत्रावरील भात आणि कांदा पिकांचे नुकसान झाले. 2 हजार 910 शेतकर्यांना अवकाळीचा फटका बसला. संगमनेर तालुक्यातील 13 गावांत अवकाळीने 133 हेक्टरवरील द्राक्ष आणि कपाशीचे नुकसान केले. याचा फटका 215 शेतकर्यांना बसला. राहाता तालुक्यात 4 गावांतील 52 हेक्टर क्षेत्रावरील कपाशी, मका आणि केळीचे नुकसान झाले. या तालुक्यातील 82 शेतकर्यांचे नुकसान झाले.
रविवारी झालेल्या या जोरदार पावसाने 107 गावांतील 8 हजार 571 हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले असून, 15 हजार 307 शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. या बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
शंभर जनावरे जखमी
अवकाळी पावसामुळे श्रीरामपूर तालुक्यात रविवारी एक बैल दगावला. राहुरी तालुक्यात 3 मेंढ्या आणि 2 कोकरे, संगमनेर तालुक्यात 4 मेंढ्या दगावल्या. याशिवाय अंदाजे शंभर जनावरे जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
घरांची पडझड
वादळी वारा आणि जोरदार पावसाने अकोले व कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी 1, पारनेर तालुक्यातील 4, राहुरी तालुक्यातील 7, संगमनेर तालुक्यातील 10 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 2 अशा एकूण 25 घरांची अंशत: पडझड झाली.
आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी
जिल्ह्यात 97 महसूल मंडळांपैकी जवळपास 75 मंडळांत अवकाळीने हजेरी लावली. निघोज, भातकुडगाव, सलाबतपूर, कुकाणा, देवळाली प्रवरा, आश्वी, शिबलापूर व तळेगाव या आठ मंडलांत अतिवृष्टी झाली. पळशी, सात्रळ, टाकळीमियाँ, ताहाराबाद, समनापूर, पिंपरणे, साकीरवाडी, शेंडी आणि बेलापूर या मंडलांत 50 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.