श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शांततेत आंदोलन करा. कुठेही हिंसा करु नका. आपल्या आरक्षण आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. आरक्षणाची लढाई अंतीम टप्प्यात आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जातीय दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहेत. आता आपली एकजूट ठेवा. काही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मराठा समाजाच्या पदरामध्ये आरक्षण पडल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नसल्याचा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पा. यांनी सरकारला दिला. येथील थत्ते मैदानावर सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित महाविराट सभेत ते बोलत होते. यावेळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र गीताने सभेस सुरुवात करण्यात आली.
जरांगे म्हणाले, आरक्षणाची लढाई आपण 85 टक्के जिंकलो. आता लढाई अंतीम टप्प्यात आली आहे. या काळात कुठेही मराठा- ओबीसी वाद होता कामा नये. आता गाफील राहू नका. आरक्षण मिळेपर्यंत कुणाचेही झेंडे हातामध्ये घेऊ नका. आजपर्यंत त्यांचेच झेंडे आपण हाती घेतले. त्यांनी आपल्यासाठी काय केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शांततेच्या आंदोलनामुळे शासनाने सन 1805 ते 1967 आणि 1967 ते 2023 पर्यंतच्या नोंदी पहाण्याची मोहीम सुरू केली. सुमारे 70 वर्षांचा आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आत्तापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या. त्याआधारे सुमारे पावणेदोन कोटी मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. आणखी नोंदी पहाण्याचे काम सुरुच आहे. आरक्षणावर आमच्या मुलांचे भवितव्य अवलंबून आहे. गायकवाड कमिशनने मराठ्यांना 12 ते 13 टक्के मागास घोषित केले होते, परंतु तरी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही. सुमारे 70 वर्षांपासून या नोंदी दडपून ठेवण्याचे पाप कुणी केले, हे लवकरचं जनतेसमोर येणार आहे. जेव्हा आरक्षणाचं वाटप झालं तेव्हा मराठा समाजाने कुणालाही विरोध केला नाही. आपल्या हक्काचंही इतरांना देऊ केलं. आपल्या मुलांच्या डोळ्यामधील पाणी सोडून इतरांच्या मुलांच्या डोळ्याचं पाणी मराठा समाजानं पुसलं. आपलं पोर उपाशी पोटी ठेवून इतरांच्या पोटाला घास दिला, परंतु आता घशापर्यंत आलयं. आता नाही तर कधीच नाही. यामुळे आता शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवा. जाळपोळ कुठे करू नका, असे जरागे यांनी सांगितले.
दि. 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावामध्ये पूर्ण ताकदीनिशी साखळी उपोषण सुरू करा. आरक्षण मिळेपर्यंत कुणाचाही झेंडा हातामध्ये घेऊ नका, असा निर्वाणीचा सल्ला जरांगे यांनी मराठा समाजाला दिला.
भुजबळांवर नाव न घेता टीकास्त्र..!
आमचा त्यांना व्यक्ती म्हणून विरोध कधीच नव्हता. त्यांच्या विचाराला विरोध होता, परंतु आता व्यक्ती म्हणून त्यांना विरोध आहे. जो माणूस घटनेच्या महत्वाच्या पदावर असून देखील दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करतो. त्याला आमचा विरोधच राहणार आहे. या माणसाने मी कुणाचं खातो, कुठे राहतो हे काढलं, परंतु हा कुठे राहत होता. कुणाची भाजी आणून विकत होता. मुंबईमध्ये काय आहे. याबाबत मला सर्वकाही माहित आहे, पण त्याविषयी आपणाला काही बोलायचं नाही, असेही जरांगे पा. म्हणाले.