सुरुवात मी केली, लंके शेवट करणार ! : आमदार प्रा. राम शिंदे

सुरुवात मी केली, लंके शेवट करणार ! : आमदार प्रा. राम शिंदे

पारनेर/टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा :  आमदार नीलेश लंके यांच्या आगमनाने आमच्या दिवाळी फराळाची सुरुवात झाली. आमदार लंके यांच्या फराळाचा शेवट करायला मी आलोय. सुरुवात आपणच करू व शेवटही आपणच करू, असे सांगत आमदार प्रा. राम शिंदे यांनी भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असलेल्या नीलेश लंके यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून राजकीय फटाके फोडल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार लंके यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमास आमदार शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, नगरचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी या भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावत जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. शिंदे, कोल्हे, गांधी व विखे यांच्यातील वितुष्टामुळे त्यांची आमदार लंके यांच्या कार्यक्रमास असलेली हजेरी लक्षवेधी ठरली.

आमदार शिंदे म्हणाले, सकाळी मी आयोजित केलेल्या फराळाला लंके उपस्थित होते. संध्याकाळी मी, सुवेंद्र गांधी, विवेक कोल्हे तयांच्या फराळाला उपस्थित आहोत. आमदार लंके यांचे आखीव-रेखीव व नेटके नियोजन आहे. कोणत्याही कामाचे नेटके नियोजन करू शकतो, याचे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण म्हणजे आमदार नीलेश लंके हे आहे. कोविड काळात प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत असताना, आमदार लंके यांनी हजारो लोकांची जीव वाचविले. भाविकांना मोहटादेवी दर्शनाचे नियोजन पाहून मी चकीत झालो. आम्हीही निवडणुकीत यात्रेचे नियोजन केले होते. पण, आमच्या गाडीतून प्रचार मात्र दुसर्‍याचा झाला. तिथे रिक्षा आणि पुजारी यांना विरोधकांनी फोडले. लंके यांच्या नियोजनात मात्र कोणासही शिरकाव करण्याची स्थिती नव्हती. लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्याचे काम आमदार लंके करत असल्याचे शिंदे म्हणाले.

यावेळी दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र गुंड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, बाळासाहेब नाहाटा, प्रदीप परदेशी, विठ्ठल काळे, अरूण लांडगे, मजूर फेडरेशनचे चेअरमन अर्जुन बोरूडे, सदस्य गहिनीनाथ शिरसाठ, बाळासाहेब निंबाळकर, बापू तांबे, बबन गाडेकर, रामदास झेेंडे, दिनकार पंदरकर, मोहनराव आढाव, बाळासाहेब उगले, विठ्ठलराव जंगले यांच्यासह जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मी बारीक नाही, माजी पालकमंत्री आहे !
आम्ही एकत्र आलो तर, बर्‍याच लोकांना वाटते हे कसे एकत्र आले? जसे दुसरे एकत्र आले, तसेच आम्हीही एकत्र आलोय. मी देखील बारीक नाही, माजी पालकमंत्री आहे. कोणी कोणाशी बोलू नये, अशी आपल्या राज्याची, जिल्ह्याची संस्कृती नाही. एकमेकांच्या दिवाळी फराळाला गेले पाहिजे. काय अर्थ काढायचा, ते ज्याने त्याने समजायचे आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.

सगळं गोड होऊ दे ना एकदा !
फराळात कडू थोडं काय आहे? आमचा फराळ गोड, तुमचा फराळ गोड! सगळं गोड होऊ दे ना एकदा! काय अडचण आहे? साखर चांगली वापरलेली आहे. कारण आम्हा दोघांकडे साखर कारखाने नाहीत. आम्ही विकत घेऊन साखर वाटू! लोक लोकांना मोठे करतात आणि छोटे करायलाही मागे पुढे पाहत नाहीत, असा आरोपही आमदार शिंदे यांनी केला.

अहंकार्‍यांना बसविण्यासाठी लंकेंना साथ द्या
दिवसभर भेटी देत येथे आल्यावर आमचा सगळा थकवा निघून गेला. कोविड काळात मी आमदार लंके यांचे काम पाहिले. राक्षसरूपी रावणाचा वध करून प्रभू श्रीराम आले होते. त्यामुळेच दीपोत्सव साजरा केला जातो. अहंकारी विचाराचे समाजातील लोक खाली बसविण्यासाठी आमदार लंके यांच्यासारख्या देव माणसासोबत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. त्यांच्यावर 2024 चा गुलाल उधळला जावा, असे विवेक कोल्हे म्हणाले.

राजकीय फटाके फुटले !
दिवाळीची सुरुवात गोड झालीय. राजकीय फटाके तर फुटलेच आहेत. टीका टीपण्णी करण्यापेक्षा नीलेश लंके यांनी कमी कालावधीमध्ये समाजासाठी मोठे काम केले आहे. त्यांना आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे. भविष्यकाळात त्यांनी अधिक चांगले काम करावे, असे सुवेंद्र गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news