Nagar : निळवंडेचे पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक | पुढारी

Nagar : निळवंडेचे पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : अवघ्या एक किलोमीटरवर निळवंडे डावा कालवा जात आहे. मात्र या कालव्याच्या पाण्याचा करुले गावातील शेतकर्‍यांना एक थेंबाचाही फायदा होत नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. जर पाण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले नाहीतर आम्ही सर्व शेतकरी आंदोलन करू, वेळप्रसंगी राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करून आगामी निवडणुकीच्या मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकू, असा इशारा या आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील निळवंडे आणि करुले गावाच्या सरहद्दीजवळून निळवंडे धरणाचा डावा कालवा जात आहे. या कालव्याला सध्या पाणी सोडले गेले आहे. ते पाणी परिसरातील गावांमधील बंधार्‍यात सोडून बंधारे भरले जात आहे. परंतु कायमच दुष्काळ पाचवीला पुजलेला करूले गावाला डाव्या कालव्याच्या पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी या गावातील सर्व शेतकर्‍यांनी एकत्रित येत गावातील हनुमान मंदिराच्या समोर सर्व शेतकर्‍यांची एकत्रित बैठक घेतली.

करुले गावातील बंधारे भरण्यासाठी निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी आणण्यासाठी जो राजकीय पक्षाचा नेता मदत करेल, तोच आमचा नेता अनतोच आमचा पक्ष, अशी भुमिका मांडली. भविष्यात जर निळवंडे चे पाणी करुले गावाला पाणी मिळाले नाहीतर लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी येणार्‍या सर्व निवडणूकांच्या मत दानावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा माजी सरपंच रभाजी आहेर, गोपीनाथ आहेर, दत्तात्रय आहेर, रेवन आखाडे, अरिफ पठाण, जालिंदर आखाडे, साहेबराव गायकवाड, संदीप आहेर, विलास आहेर, रामा आहेर, कैलास आखाडे, प्रशांत कोल्हे, साईनाथ आहेर, भालचंद आखाडे, इसाक पठाण आदी शेतकर्‍यांनी दिला आहे.

करूलेच्या शेतकर्‍यांना पाण्याचा थेंबही मिळेना
या बैठकीमध्ये गेली 40 वर्ष निळवंडे धरणाच्या पाण्याचा परिसरातील शेतकरी बांधव चातकाप्रमाणे वाट पाहत होते. ते पाणी एकदाचे निळवंडेच्या डाव्या कालव्याला सोडले गेले. या पाण्याचा परिसरातील अनेक गावांना फायदा झाला. परंतु करुले गावातील एकाही शेतकर्‍यास थेंबाचाही फायदा होत नाही म्हणून गावातील जवळपास 400 ते 500 शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा :

Back to top button