दिवाळीच्या फराळालाही महागाईची झळ | पुढारी

दिवाळीच्या फराळालाही महागाईची झळ

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत्या महागाईची चर्चा सुरू आहे. त्याचीच झळ यंदाच्या दिवाळीला आणि दिवाळीच्या फराळालाही बसल्याचे दिसत आहे. किराणा महागल्याने मिठाई दुकानात चकली, बेसन लाडू, रवा लाडू, शंकरपाळे, शेव इत्यादीचे भाव वाढलेले दिसले. दिवाळीच्या तोंडावरच खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. साखरही 40 रुपयांना शिवल्याने तीही सर्वसामान्यांना ‘कडू’ वाटू लागली आहे. त्याचा थेट परिणाम फराळावर झाला असून, या वर्षी प्रत्येक पदार्थामागे 10 ते 70 रुपयांपर्यंत्त वाढ झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

वास्तविकतः दिवाळीत नातेवाइकांना, मित्रमंडळींना फराळाला बोलावण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळताना दिसतो. यात नोकरदार, व्यावसायिक महिला कामामुळे दिवाळीचा फराळ घरी न बनविता विकत आणतात किंवा आचार्‍याकडून बनवून घेतात. परिसरातील बचत गट, घरगुती उद्योग आणि व्यावसायिक हे फराळाचे पदार्थ बनवून देतात. त्यांची स्टॉल, दुकानात विक्रीही करतात. काल रविवारी दिवाळीच्या दिवशी यात मिठाई दुकानात फराळ खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची मोठी लगबग पाहायला मिळाली.

घरगुती फराळाला वाढती मागणी
नगरसह अन्य काही ठिकाणी महिला बचत गट तसेच केटरर्सकडे दिवाळीचे फराळ बनविण्याकडे नागरिकांचा कल दिसला. आपली ऑर्डर दिल्यानंतर ते पदार्थ त्या ठिकाणी बनवून दिले जातात. मिठाई दुकानापेक्षा हे दर 10 ते 20 रुपयांनी अधिक दिसत असले, तरी या पदार्थांची चव आणि दर्जा पाहताना या पदार्थाची नगरकरांना ‘गोडी’ लागल्याचे दिसते.

किराणा महागल्याचे चित्र
हरभरा डाळ, मूगडाळ, तूप, साखर, बेसन, पोहे, शेंगदाणे, खाद्यतेल यांच्या किमती वाढल्या आहेत. काही दुकानांतील प्रतिकिलो भाव ः चकली ः 250, शंकरपाळी ः 300, शेव ः 240, चिवडा 250, बेसन लाडू 350, रवा लाडू 380.

झेंडूचे भाव पडलेलेच; अगदी शेवटी वाढले भाव
दसर्‍याला झेंडू फुलांचे भाव पडल्याने अक्षरशः शेतकरी हवालदिल झाला होता. आता दिवाळीला तरी किमान 100 रुपयांचा भाव मिळेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र कालही बाजारात 40 ते 50 रुपये किलो भाव मिळाल्याचे दिसले. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना फुले खरेदीतून कोणतीही वाढीव झळ बसलेली दिसली नाही. अर्थात, दुपारी चारनंतर मात्र सावेडी उपनगरांत प्रोफेकर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक अशा ठिकाणी फुले कमी दिसू लागल्यानंतर भाव वाढल्याचे जाणवले. काही विक्रेत्यांनी शेवती 200 रुपये, तर झेंडू 150 रुपये किलो दराने विकले. मात्र अगदी शेवटी शेवटी थोड्याच फुलांची या वाढीव दराने विक्री झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

Back to top button