

नगर : पुढारी वृत्तसेवा : 'दीप जलाओ,' 'ताने स्वर रंगवावा,' 'बोलावा विठ्ठल,' 'मी राधिका' आणि 'अवघा रंग एक झाला' अशा एकापेक्षा एक सुमधुर गीतांद्वारे शुक्रवारी पहाटे नगरकर रसिक प्रेमरस आणि भक्तिरसात चिंब झाले. निमित्त होते 'दिवाळी पहाट' या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या संगीत मैफिलीचे. दैनिक 'पुढारी'तर्फे 'मी राधिका' ही स्वरमैफिल खास दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. आरती अंकलीकर यांची कन्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांनी या मैफिलीचे निवेदन केले. कलर्स मराठी हे या दिवाळी पहाट मैफिलीचे मीडिया पार्टनर, थॉमस कुक ट्रॅव्हल पार्टनर, तर लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटी बँकिंग पार्टनर होते.
उगवतीवर पसरलेली लाली हळूहळू नारंगी-पिवळी होत होत सारे आसमंत उजळून जावे, तशी ही पहाट मैफल नगरकरांंच्या भरघोस प्रतिसादाने उत्तरोत्तर रंगत गेली आणि रसिकांचे कान स्वरप्रकाशाने जणू तृप्त झाले. आरतीताईंनी स्वतः राग अहीर भैरवमध्ये बांधलेल्या 'दीप जलाओ मंगल गाओ' या बंदिशीने सुरू झालेली ही मैफल संपूच नये असेच नगरकर रसिकांना वाटत होते.
परमेश्वराची साधना संगीताच्या माध्यमातून सर्वांत चांगल्या पद्धतीने करता येते, असे सांगत आरतीताईंनी 'ताने स्वर रंगवावा' हे संत रामदास स्वामींचे पद गाऊन ईशसाधनेबरोबरच रसिकांनाही संगीतसाधनेत तल्लीन केले. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले हे पद मधुर बासरीचे स्वर, पखवाज व तबल्याची जुगलबंदी आणि आरतीताईंच्या आलापी अन् तानांनी भारलेले होते.
त्यानंतर 'हे बंध रेशमाचे' या नाटकातील 'सजणा, का धरीला परदेस' हे पद आरतीताईंनी गायले. कवयित्री शांता शेळके यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या नाट्यपदाला पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत लाभले आहे. त्यातील 'श्रावण वैरी बरसे झिरमिर, चैन पडेना जीवा क्षणभर, जाऊ कोठे, राहू कैसी' ही साद घालताना ओथंबलेली आर्तता रसिकांना व्याकुळ करून गेली. प्रेमरंगात चिंब झालेल्या नगरकरांना मग भक्तिरसात न्हाऊ घालत संत तुकोबारायांचा 'बोलावा विठ्ठल' हा अभंग त्यांनी सादर केला. विशेष म्हणजे त्यांच्यासोबतच लयबद्ध टाळ्या वाजवत 'विठ्ठल-विठ्ठल' गाणार्या रसिकांतून 'वन्स मोअर'ची साद घालण्यात आली आणि आरतीताईंनी त्याला लगोलग प्रतिसादही दिला. पाठोपाठ प्रतीक सलगर यांनी गायलेल्या संत चोखोबांच्या 'अबीर गुलाल'ने रसिकांची ब्रह्मानंदी टाळीच लागली.
पंढरीची सैर घडविल्यानंतर आरतीताईंनी रसिकांना गोकुळात नेऊन सोडले. 'सावळा नंदाचा मूल बाई खोटा' ही गवळण सादर झाल्यानंतर ही प्रेक्षकांतूनच उमटलेली प्रतिक्रिया होती. मग पाठोपाठ कृष्णप्रेमाची कबुली देणारा 'मी राधिका, मी प्रेमिका' या गीताच्या रूपाने मैफिलीचा परमोच्च क्षण साजरा झाला.
आपल्या गुरू किशोरी आमोणकर यांनी संगीतबद्ध केलेल्या, संत चोखोबांच्या 'अवघा रंग एक झाला' या अभंगाची ऊर्जा देऊन आरतीताईंनी या मैफिलीची सांगता केली. अर्थात ही केवळ मैफलीची सांगता होती. प्रत्येकाचे गात्रन्गात्र स्वरांकित झाल्याने सर्व पावले आपसूक आरतीताईंच्या जवळ जाण्यासाठी धडपडत होती. आरतीताई आणि स्वानंदी त्यांच्यासोबत स्वतःची छबी मोबाईलच्या पडद्यावर टिपून घेण्यासाठी जणू अहमहमिकाच लागली होती. या दोघी मायलेकींनीही प्रत्येकाच्या इच्छेला मान दिला. दिवाळीच्या सुरुवातीलाच ओठांवर रेंगाळणार्या चवीचे खमंग संगीत फराळ दिल्याबद्दल दैनिक पुढारीचे विशेष आभार मानत आणि गुणगुणत नगरकर रसिकांनी सभागृह सोडले.
स्वानंदी आणि आई…
आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या कन्या स्वानंदी टिकेकर यांनी या मैफिलीत रसिकांना आपलेसे करून घेणारी शब्दयोजना करत ओघवत्या भाषेत निवेदनाची बाजू सांभाळली. निवेदक म्हणून स्वानंदी यांची आईसोबतची ही पहिलीच मैफिल होती. त्यामुळे गाण्याची, आईच्या गायनाची महती सांगताना त्या कधी 'आरतीताई' संबोधत होत्या, तर कधी आई… प्रतीक सलगर, अनुराधा मडलिक, सरगम चन्ना या आरतीताईंच्या सहकलाकार होत्या, तर विभव खांडोळकर (तबला), अभिषेक सीनकर (हार्मोनियम), गणेश पापळ (पखवाज) आदित्य आपटे (साईड र्हिदम) आणि सुनील अवचट (बासरी) यांनी मैफिलीत साथसंगत केली.
'पुढारी'तर्फे मान्यवरांचे स्वागत
'पुढारी'चे नॅशनल हेड-(मार्केटिंग) आनंद दत्त यांनी उत्कृष्ट संयोजन केले. ब्यूरो चिफ संदीप रोडे यांनी पुढारीच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यक्रमाची भूमिका विशद केली. युनिट हेड (मार्केटिंग) संतोष धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. इव्हेंट हेड बाळासाहेब नागरगोजे व व्यवस्थापक (मार्केटिंग) राहुल भिंगारदिवे यांनी स्वागत केले.
उपस्थित मान्यवर…