नगर जिल्ह्यातील 96 महसूल मंडळे दुष्काळ सदृश : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

नगर जिल्ह्यातील 96 महसूल मंडळे दुष्काळ सदृश : पालकमंत्री राधाकृष्ण विखे
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळाचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या गावांना दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणार्‍या सर्व सवलती लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्रालयातील गुरुवारी (दि.9) वॉर रुममध्ये झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित गावांच्या बाबतीत जिल्हाधिकार्‍यांकडून लवकरच अहवाल मागवून, या गावांबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे, कृषीमंत्री धनंजय मुडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी विभागाचे मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाचे अतिरिक्त सचिव सोनिया शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, कृषी विभागाचे सचिव सुनील चव्हाण उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे नुकताच 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी 75 पेक्षा कमी आणि 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला हा निकष लक्षात घेऊन, जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 96 मंडलाच्या गावांचा समावेश आता दुष्काळी गावांच्या यादीत करण्यात आला आहे.

राज्यात पशुधनाच्या चार्‍यासाठी 1 लाख लाभार्थी शेतकर्‍यांना 5 लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी लागणार्‍या 30 कोटी रूपये खर्चासाही मान्यता या बैठकीत मान्याता देण्यात आली आहे. पशुपालकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.नव्याने अस्तित्वात आलेली महसुली मंडळे, जिथे अद्याप पर्जन्यमापक बसविलेले नाहीत किंवा बिघडलेली आहेत, अशा महसुली मंडळांचे अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात आले असल्याचेही विखे पाटील म्हणाले.

ही आहेत 96 महसुली मंडळे
नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रूईछत्तीशी, विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजूर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, अकोले, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रूक, सतलबपूर, कुकाणा,चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी मानूर, करंजी, मिरी, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी, राहुरी बुद्रूक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, ब्राम्हणी, वांबोरी, संगमनेर बुद्रूक, धांदरफळ बुद्रूक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठण, कोळगाव, श्रीरामपूर, बेलापूर बुद्रूक, उंदिरगाव, टाकळीभान.

या मिळणार सवलती
जमीन महसूल माफ, पीक कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या वीज बिलाच्या वसुलीस स्थगिती, शालेय व महाविद्यालयीन फी माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाण्याचे टँकर, अशा सवलती तातडीने लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news