Nagar News : भाजप तालुकाध्यक्षपदी कुणाची वर्णी?

नेवासा : तालुका भाजपच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या, भाजप सत्तेत असल्याने या निवडीकडे गांभीर्याने बघितले जात आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता, भाजप तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पेचे, अंकुश काळे किंवा ऋषिकेश शेटे यांच्या पैकीच एकाची निवड होण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह लोकसभा, विधानसभा निवडणूक होणार आहे. या काळात असलेल्या भाजप तालुकाध्यक्षाला महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. या पदावर आपली निवड व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
नेवासा तालुका भाजपच्या तालुकाध्यक्ष बदलाच्या हालचालीत पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपचे जिल्हा सचिव अंकुश काळे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश शेटे आदी शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. या तिघांपैकी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. ज्ञानेश्वर पेचे यांनी यापूर्वी 2014 ते 2019 पर्यंत तालुकाध्यक्षपद भूषविले होते. तसेच, अंकुश काळे जिल्हा कार्यकारिणीत सध्या सचिव म्हणून काम पाहत आहेत. किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांचेही नाव आघाडीवर येण्याची शक्यता आहे.
नेवासा तालुक्यात फुलारी यांच्या रूपाने ‘ओबीसी’ चेहरा मिळालेला असल्याने, आगामी काळात पक्षाला मोठी मदत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, आता श्रेष्ठींनी त्यांची प्रदेश पातळीवर नियुक्ती केल्याने त्यांचे नाव तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपोआपच मागे पडले आहे. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनीही बाळासाहेब मुरकुटे आमदार असताना पक्ष संघटना मजबुतीसाठी प्रयत्न केले आहेेत. विविध कामे मार्गी लावलेली आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर पेचे व किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश शेटे, तसेच अंकुश काळे यांच्यामध्येच तालुकाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होणार असल्याचे बोलले जात आहे.
वरिष्ठ पातळीवरून नाव जाहीर होणार?
तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. वरिष्ठांकडे काहींनी मुलाखतीही दिलेल्या आहेत. आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक पातळीवर अडचण नको, म्हणून तालुकाध्यक्ष पदाचे नाव वरिष्ठ पातळीवरून घोषित होण्याची शक्यता आहे.
मनासारखा तालुकाध्यक्ष हवा!
सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर गटतट, मतभेद असतात. नेवाशात जुना-नवा भाजप, असा वाद नेहमीच चव्हाट्यावर येत असतो. परंतु, अनेक दिवसांपासून असा वाद दिसून आलेला नाही. आगामी निवडणुका व सर्वांना आडकाठी न ठरणारा तालुकाध्यक्ष श्रेष्ठींना द्यावा लागणार असल्याची चर्चा सामान्य जनतेत आहे.