Nagar News : जोरदार पावसाने दोन तलाव फुटले ; काम निकृष्ट झाल्याचा टाकळी लोणारच्या ग्रामस्थांचा आरोप

Nagar News : जोरदार पावसाने दोन तलाव फुटले ; काम निकृष्ट झाल्याचा टाकळी लोणारच्या ग्रामस्थांचा आरोप

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील टाकळी लोणार येथे वन खात्याने तयार केलेला मातीनाला बांध शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने फुटला. या नाल्याच्या खाली असणारा गायरान तलावही मधोमध फुटल्याने तलावातील पाणी वाहून गेले. परिणामी तलावाखालील जमिनीचे नुकसान झाले. काम निकृष्ट झाल्यानेच हे दोन्ही तलाव फुटले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. काल(दि. 23) सायंकाळी टाकळी लोणार परिसरात जोरदार पाऊस झाला. गावाच्या वरच्या भागात वन खात्याने एक मातीनाला बांध तयार केला आहे.

त्यावेळी सांडव्याची योग्य ती व्यवस्था करण्यात आली नाही. तलाव पूर्ण भरूनही सांडव्यातून पाणी बाहेर पडले नाही. पाण्याचा दाब भरावावर आला. भराव मधोमध फुटल्याने पाणी खालच्या गायरान तलावात आले. गायरान तलावही भरावाच्या मध्यभागी फुटल्याने या तलावात साठलेले लाखो लिटर पाणी वाहून गेले. तलावाच्या खाली असणार्‍या शेतजमिनीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तलाव फुटल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी काल सकाळी घटनास्थळी धाव घेत संबंधित अधिकार्‍यांना माहिती दिली. काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दुपारपर्यत कोणतेही अधिकारी पाहणी करण्यासाठी आले नसल्याचे समजते.

तालुक्यात छोटे-मोठे शेकडो तलाव आहेत. लघु पाटबंधारे व स्थानिक स्तर यांच्याकडे या तलावांची दुरुस्ती, देखभालीची जबाबदारी आहे. वन खात्याने तयार केलेल्या छोट्या तलावाचे काम योग्य पद्धतीने न झाल्यानेच तो फुटला. गायरान तलावाची मागील काही वर्षांत दुरुस्ती झाली होती. मात्र, तरीही हा तलाव भरावाच्या मधोमध फुटला असल्याने या तलावाची नेमकी काय दुरुस्ती केली असा प्रश्न आहे.

तलावाची दुरुस्ती करा
मातीनाला बांध व गायरान तलाव मधोमध फुटल्याने हजारो एकर क्षेत्रावरील रब्बी हंगाम धोक्यात आला. या तलावाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी टाकळी लोणार मधील सोसायटीचे अध्यक्ष कैलास मते, माजी सरपंच मारुती भांडवलकर, दादासाहेब जगदाळे, अप्पासाहेब रोडे, संदीप काळे, सतीश गायकवाड यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news