Rohit pawar News : दादा… आम्ही बस स्थानकावर अडकलोय; विद्यार्थिनींचा थेट रोहित पवारांना फोन | पुढारी

Rohit pawar News : दादा... आम्ही बस स्थानकावर अडकलोय; विद्यार्थिनींचा थेट रोहित पवारांना फोन

कर्जत(नगर); पुढारी वृत्तसेवा : दादा… आम्ही कर्जत बस स्थानकावर अडकून पडलो आहोत.. अंधार पडू लागला आहे… शिवाय जोरदार पाऊसही सुरू आहे. जाण्यासाठी एसटी नाही.. असा फोन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी थेट आमदार रोहित पवार यांना केला. अन् आमदार पवार यांनी तत्काळ स्वतंत्र गाडी पाठवून पावसात अडकलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना थेट घरी पोहच केले. कर्जत बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता तालुक्यातील वालवड, चांदे, कोंभळीसह परिसरातील शाळा महाविद्यालयातील 35 ते 40 विद्यार्थी-विद्यार्थिनी व काही महिला, वृद्ध नागरिक घरी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत होते.

मात्र, एसटी येत नव्हती. वाहतूक नियंत्रक एसटी येईल असे सांगत होते. मात्र, एसटी नादुरुस्त झाल्यामुळे मध्येच बंद पडलेली असल्याचे सायंकाळी सहा वाजता समजले. दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला होता व अंधारही पडू लागला होता. यामुळे सर्व विद्यार्थिनी, विद्यार्थी व त्यांचे पालक काळजीत पडले होते.

अशा परिस्थितीत एका विद्यार्थिनीने थेट आमदार रोहित पवार यांना फोन केला व सर्व वस्तुस्थिती सांगितली. रोहित पवार हे मुंबईच्या दौर्‍यावर होते. मात्र, त्यांनी फोनवरूनच कुणीही काळजी करू नका, मी तुमची जाण्याची व्यवस्था करतो, असे सांगितले. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत कर्जत बसस्थानकावर त्यांनी खासगी बस पाठवून सर्व विद्यार्थी, महिला, वृद्ध, लहान मुलांना जाण्याची व्यवस्था करून दिली. बसस्थानकावर उपस्थित असणारे प्राचार्य डॉ.संजय नगरकर, आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक यांचे एका वृद्ध प्रवासी व्यक्तीने हात जोडून आभार मानले. आमदार पवार यांच्यामुळे मी आज रात्री घरी जाऊ शकलो आहे .अन्यथा मला रात्रभर बस स्थानकावर बसून राहावे लागले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा

राहुरीत शेकडो बालकांना उपचार मिळाल्याचे समाधान : आ. तनपुरे

नगर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतकर्‍यांमध्ये समाधान

चीनमधील हाँगझोऊ शहरात रंगणार स्पर्धा

Back to top button