

नेवासा : गेल्यावर्षी सुरुवातीला कापसाला चांगला दर होता. मात्र, त्यानंतर दरात घसरण झाली. दराच्या आशेने अगदी जूनपर्यंत कापूस घरात ठेवूनही उपयोग झाला नाही. तरीही यंदा कापसाची लागवड गतवर्षीपेक्षा वाढली आहे. मात्र, यंदाही कापसाचे पीक अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे. पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून, उत्पादन घटणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. खरिपाबरोबरच रब्बीच्या आशा धूसर बनल्या असून, आता परतीच्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी कापसाचे दर पडले. अगदी महिनाभरापर्यंत शेतकरी कापसाची विक्री करत होते. परंतु, चांगला दर मिळालाच नाही. लागवडीच्या काळातही पाऊस नव्हता. त्यामुळे कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता होती. मात्र, असे असताना यंदाही कापसाच्या लागवडीने सरासरी ओलांडलेली आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 327 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असून, शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 46 हजार 781 हेक्टरवर कापूस लावला आहे.
पंधरा-वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने बहुतांश भागात कापसाची वाढ खुटंली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा 18 हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक कापूस लागवड झालेली आहे. गतवर्षी 1 लाख 31 हजार 962 हेक्टरवर लागवड झाली होती.
नगर जिल्ह्यात खरिपाचे 5 लाख 79 हजार 768 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पूर्वी खरिपात सर्वाधिक बाजरीचे क्षेत्र असायचे. आता ते कमी होऊन कापूस, सोयाबीन वाढले आहे. यंदा सोयाबीनची 1 लाख 78 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्याला लागून असलेल्या शेवगाव, पाथर्डी, तालुक्यात पूर्वीपासून कापसाचे उत्पादन घेतले जायचे. मात्र, अलिकडच्या काळात कर्जत, नगर, श्रीगोंद्यासह उसाचा पट्टा असलेल्या राहाता, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, नेवासा भागातही कापसाची लागवड वाढत आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी या तालुक्यात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र असून, यंदाही या तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक लागवड झालेली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात कापसाचे क्षेत्र कमी असले तरीही यंदा सरासरीपेक्षा अधिक कापूस लागवड झाली आहे.
नगर जिल्ह्यात सुरुवातीला उशिराने पाऊस आला. त्यानंतरही अजून अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. त्याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. कापसाची वाढ खुंटली आहे. शिवाय पाते लागण्यासही उशीर होत आहे. त्यामुळे यंदाही आर्थिक फटका सोसावा लागणार असल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी सुरुवातीला कापसाला चांगला दर मिळत होता, मात्र त्यानंतर दरात घसरण झाली. दरवाढीच्या आशेने शेतकर्यांनी अगदी जूनपर्यंत कापूस ठेवला. परंतु, उपयोग झाला नाही. तरीही यंदा कापसाची लागवड गतवर्षीपेक्षा वाढली आहे. मात्र, यंदाही कापसाचे पीक अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे. पाऊस नसल्याने रब्बी हंगामातही आशा धूसर बनत आहे. आता परतीचा पाऊस 17 सप्टेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. या पावसावरच पाणीपातळी व पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुकानिहाय कापूस लागवड (हेक्टर)
नगर 1121, पारनेर 116, श्रीगोंदा 6827, कर्जत 5,459, जामखेड 274, शेवगाव 46781, पाथर्डी 33305, नेवासा 28967, राहुरी 15351, संगमनेर 2736, अकोले 0, कोपरगाव 1671, श्रीरामपूर 5394, राहाता 1334.
गेल्यावर्षी कापसाला भाव न मिळाल्याने मोठे नुकसान झाले. यंदा मोठ्या आशेने कपाशी केली. मात्र, पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून, उभे पीक जळून चालले आहे. दमदार पावसाची गरज आहे.
– प्रदीप भांगे, शेतकरी, खडका