धक्कादायक ! संगमनेरच्या तहसीलदारांना वाळू तस्कराने घरी जाऊन केली शिवीगाळ | पुढारी

धक्कादायक ! संगमनेरच्या तहसीलदारांना वाळू तस्कराने घरी जाऊन केली शिवीगाळ

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना एका वाळू तस्कराने थेट त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत धमकी दिली असल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. याबाबत संगमनेर शहर पोलीसात त्या वाळू तस्कराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी बाबत संपूर्ण राज्यात कठोर भूमिका घेतलेली असताना सुद्धा संगमनेर तालुक्यातील प्रवरा, मुळा, अढाळा व म्हाळुंगी या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्करीस महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याचा आरोप होत असून, या सर्व वाळू तस्करांवर महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वचक नसल्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले जात असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे वाळू तस्करांची जास्तच मगरुरी वाढली असल्याचे तहसीलदारांना शिव्या देण्यापर्यंत गेली असल्याचे दिसून येत आहे.
संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात राहणारा वाळू तस्कर शुभम थोरात हा सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मालपाणी नगर परिसरातील घरी गेला. त्याने तहसीलदारांच्या बंगल्याच्या प्रवेश द्वारात प्रवेश करत त्यांच्या घराची बेल वाजवली असता तहसीलदार मांजरे यांनी घराचा दरवाजा लवकर न उघडल्यामुळे थोरात या वाळू तस्कराने दरवाजावरती थापा मारून त्यांनाच जोरजोराने शिवी गाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर तहसीलदार मांजरे यांनी आपल्या घराचा दरवाजा उघडला असता माझा कॉल का घेतला नाही, असे म्हणून थोरात या वाळू तस्कराने मागचा पुढचा विचार न करता थेट त्यांनाच शिवीगाळ केली. यानंंतर तो निघून गेला. याबाबत तहसीलदार धीरज मांजरे त्यांनी शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी शुभम थोरात याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निवांत जाधव करत आहे.

हे ही वाचा :

Pune Crime News : बहिणीला त्रास दिल्यामुळे मेव्हण्याने केला दाजीचा गेम; पुण्यातील घटना

Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे- पाटलांचा संघर्ष पडद्यावर चितारणार; चित्रपटाचे पोस्टर लाँच

Back to top button