शिर्डीतून घोलपांचा प्रयत्न पुन्हा फ्लॉप ! शिवसेनेची उमेदवारी वाकचौरे यांना जाहीर झाल्याने संभ्रम

शिर्डीतून घोलपांचा प्रयत्न पुन्हा फ्लॉप ! शिवसेनेची उमेदवारी वाकचौरे यांना जाहीर झाल्याने संभ्रम

शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सेनेची उमेदवारी मिळविलेले माजी आमदार बबनराव घोलप यांना न्यायालयीन निर्णयाने उमेदवारी गमवावी लागली होती. आता माजी खासदार वाकचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने घोलप यांच्या शिर्डीतील उमेदवारीचा प्रयत्न पुन्हा 'फ्लॉप' ठरणार असल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

'चुकीला माफी नाही' असे घोषवाक्य असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खोके गद्दार व मिंधे सरकार अशा शब्द प्रयोगापुढे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नुकतीच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना घोषीत झाली. वाकचौरे यांच्या शिवसेना प्रक्ष प्रवेशापुर्वी ही जागा नाशिकचे माजी आ. बबनराव घोलप लढविणार असल्याची घोषणा झाली होती. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख म्हणून घोलप यांची निवडही करण्यात आली, परंतु ऐनवेळी वाकचौरे यांच्या सेना प्रवेशामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिर्डी लोकसभा निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजे माजी केंद्रीय राज्यमंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचा बालेकिल्ला. यापुर्वी काँग्रेसच्या 11 विजयांपैकी 7 वेळा शिर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. 1957 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून बापूसाहेब कांबळे यांचा अपवाद वगळता 1996 मध्ये भाजपाच्या तिकीटावर स्व. भिमराव बडदे यांच्या विजयामध्ये येथील बड्या नेत्यांचा प्रभाव लपून राहिलेला नाही.

मतदारसंघ पुर्नरचनेनंतर 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षीत झाला. या बदलामुळे येथील नेते व मतदार यांच्यातील बांधीलकीची दोर काहीशी ढिली झाली. त्यामुळे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीकडील बलाढ्य उमेदवार आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा पराभव झाला. त्यावेळी शिवसेनेकडील नवखे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजश्री खेचून आणली. तेव्हापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आघाडीकडून उमेदवारी केली, परंतु त्यांनी ऐनवेळी केलेली बंडखोरी जनतेच्या पचनी पडली नाही. जनतेने पुन्हा शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना विजयी केले. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खा. सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे माजी आ. भाऊसाहेब कांबळे व अपक्ष उमेदवार माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. दोन वेळेस शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झालेले खा. सदाशिव लोखंडे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेबरोबर आहे.

खा. लोखंडे यांनी सेनेला 'जय महाराष्ट्र' करीत सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेत केलेला प्रवेश उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागला. त्यांनी लोखंडेचा पराभव करण्यासाठी माजी आ. बबनराव घोलप यांच्या नावाची घोषणा करुन तगडा उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविला होता, परंतु ऐनवेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कडव्या शिवसैनिकांनी महायुतीचे तगडे आव्हान लक्षात घेतले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला निर्णय बदलण्याची गळ घातली आहे. दरम्यान, वाकचौरे यांनी झालेल्या चुकीबद्दल माफी मागून आपला प्रवेश सुकर केला. आता माजी आ. घोलप यांची उमेदवारी पुन्हा फ्लॉप ठरणार की ते वेगळी भूमिका घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

वाकचौरे की घोलप पेच कायम..!
शिर्डी लोकसभा मतदार संघ हा राज्यातील बलाढ्य साखर सम्राटांचा बालेकिल्ला आहे. या आरक्षीत मतदारसंघामध्ये खासदार किती कार्यक्षम असावा, यापेक्षा तो किती अकार्यक्षम आहे, यावर त्याचे मुल्यमापन ठरते. माजी आ. बबनराव घोलत यांची राजकीय कारर्कीद तशी वादातीत आहे. त्यांच्यामुळे येथील बड्या नेत्यांना उपद्रव होण्याची संभवता लक्षात घेता 2014 मध्ये न्यायालयीन निकालाने बिहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांना निवडणुक रिंगणातून माघार घ्यावी लागली. यावेळी माजी खा. वाकचौरे यांच्यासारखा 'आपला माणूस आपल्यासाठी' अशी ओळख असलेला सोबर व विकासात्मक चेहरा मिळाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे उमेदवार निवडीचा पेच निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news