उंबरे गावामध्ये कौन बनेगा उपसरपंच..? | पुढारी

उंबरे गावामध्ये कौन बनेगा उपसरपंच..?

उंबरे(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील उंबरे येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक येत्या 12 सप्टेंबरला होणार आहे. यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या सदस्यांना कामाला लावले आहे. अनेकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काहींनी देव पाण्यात ठेवले आहेत. उंबरे ग्रामपंचायतीची निवडणूक मागील दोन वर्षांपूर्वी झाली. आरक्षणामुळे सुरेश साबळे सरपंच झाले, परंतु उपसरपंच पदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली. जनसेवा मंडळ व गणराज मंडळाने निवडणूक लढविली. गणराज मंडळाला 9 तर जनसेवा मंडळाला 6 जागा मिळाल्या. पहिल्या टर्ममध्ये गणराज मंडळाला उपसरपंच पद मिळाले. आता दुसर्‍या टर्ममध्ये मोठी फोडाफोडी होऊन गणराज मंडळाचे दोन तुकडे झाले. सत्ता पुन्हा जनसेवा मंडळाकडे आली, परंतु पुन्हा एकदा नेतृत्वातील संघर्ष उफाळल्याने आता काय होते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

राहुरी तालुक्यात उंबरेगाव कायम फोडाफोडीच्या राजकारणात पुढे आहे. गावात काही पुढारी लालसापोटी कुठलीही परवा न करता काही सदस्य घेऊन ‘आज या तर उद्या त्या पार्टीत’ असे प्रकार सुरू आहे. राहुरी तालुक्याला राजकारणात दिशा देणारे गाव म्हणून उंबरेकडे बघितले जाते. यामध्ये भाजपाचे बा. बा. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेवराव ढोकणे तर राष्ट्रवादीचे बा. बा. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनील आडसुरे यांच्या भोवती सत्ता फिरते; परंतु ग्रामपंचायत निवडणूकीवेळी दोघांची आघाडी झाल्याने गावामध्ये गजानन मंडळाची आली. काही छोटे -मोठे पुढारी एकत्र येऊन त्यांनी सत्ता खेचून आणण्याचे काम केले, परंतु आज मात्र पुलाखालून भरपूर पाणी गेल्याने कोण कोणत्या पक्षात, कोण कोणाच्या पाठीमागे हे सांगणे मात्र कठीण झाले आहे. पुढार्‍यांनी जवळच्या उमेदवाराला निवडणूक लढविण्याची तयारी करण्यास सांगितले. यामुळे प्रत्येकजण आपलीच उमेदवारी ‘फिक्स’ समजून तयारीला लागला आहे.

…तोच होणार उपसरपंच

उंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी संजय अडसुरे, आदिनाथ पटारे, सुनिता वाघ, कैलास अडसुरे, गणेश ढोकणे, सीमा ढोकणे आदी स्पर्धेमध्ये आहेत. नामदेवराव ढोकणे व सुनील अडसुरे हे ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील, तोच उपसरपंच होईल, असे बोलले जात आहे.

भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. नामदेवराव ढोकणे यांचा निष्ठावंत आहे, परंतु दोन टर्मपासून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य उपसरपंच झाले. आता आघाडीचा धर्म पाळून भाजपच्या वतीने मला उमेदवारी द्यावी, अन्यथा कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारचं.

-संजय अडसुरे, उंबरे ग्रामपंचायत सदस्य

हेही वाचा

हिंगोली : कावड यात्रेत आमदार बांगरांनी नाचवल्या तलवारी; गुन्हा दाखल

लेखापरीक्षण विरोधातील गोकुळची याचिका फेटाळली

पावसाने दिली ओढ, सांगली जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

Back to top button