पिंपरी : महापालिकेतील कामकाजास गती देणार : उपमुख्यमंत्री पवार | पुढारी

पिंपरी : महापालिकेतील कामकाजास गती देणार : उपमुख्यमंत्री पवार

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कामांचा तसेच, नियोजित प्रकल्पांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.25) घेतला. वाढीव व कमी दराच्या निविदाबाबत त्यांनी शंका उपस्थित करीत, कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिकेच्या विविध कामांचे सादरीकरण केले. त्याबाबत शंका व झालेल्या आरोपाबाबत पवार यांनी मुद्दे उपस्थित केले. या वेळी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे, पदाधिकारी व माजी नगरसेवक तसेच, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्याबाबत आग्रह धरल्याने ही बैठक घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना भेटून प्रश्न सोडवू. कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी मी सातत्याने आढावा घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा क्षेत्रात आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात महापालिकेने कामे झाली पाहिजेत, असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भाजप, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी गैरहजर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बैठकीस भाजप व शिवसेनेचे खासदार व आमदार तसेच, पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले की, आजच्या बैठकीला मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांना बोलविले नाही. माझ्या प्रेमापोटी ते स्वत:हून आले आहेत.

या कामांची घेतली माहिती

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पवना, इंद्रायणी व मुळा नदी सुधार योजना, पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचा विस्तार, नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्ग, अंतर्गत रिंगरोड, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, पुनावळे कचरा डेपो, महापालिकेचा सुधारित आकृतीबंध, पिण्याचे पाणी दररोज देणे, भामा आसखेड धरणावर जॅकवेल व पंपिंग स्टेशन बांधणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करणे, मोशी कचरा डेपोत 700 टन कचर्‍यातून 14 मेगा वॅट वीजनिर्मिती करणे, रस्ते व उड्डाण पुलाची कामे, महापालिकेची नवीन इमारत, यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईचे काम, स्मार्ट सिटीचे कामे, सीटी सेंटर व अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल 30 ऐवजी 60 वर्षांसाठी विकसकाला देण्याचा निर्णय, महापालिकेचा शाळेत सीबीएससी माध्यमाच्या इंग्रजी शाळा सुरू करणे, थेरगाव येथे कॅन्सर रुग्णालय सुरू करणे, मोशी येथे क्रिकेट स्टेडियम बांधणे, पिंपरी-चिंचवड शहरात सात गावांचा समावेश करणे, रस्ते प्रशस्त करून सुशोभीकरण करणे, मिळकतकराची विक्रमी वसुली.

हेही वाचा

धाराशिव : पावसाअभावी दुष्काळछाया गडद; कोवळी पिके कोमेजू लागली, उत्पादन घटणार

कोपरगावची शांतता भंग होता कामा नये : आमदार आशुतोष काळे

नाशिक : नमामि गोदा २७८० कोटींवर!

Back to top button