खर्डा ते जिल्हाधिकारी कार्यालय बिर्‍हाड पदयात्रा…! | पुढारी

खर्डा ते जिल्हाधिकारी कार्यालय बिर्‍हाड पदयात्रा...!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : खर्डा येथील मदारी समाजाची यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे बांधकाम तत्काळ सुरू करा, हे काम सुरू न झाल्यास खर्डा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गुरुवारी (दि. 31) बिर्‍हाड यात्रा वंचित बहुजन आघाडीतर्फे काढण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव यांनी दिला आहे. यासाठी खर्डा गावठाणातील कान्होबा मंदिर परिसरातील जागेवर वसाहत बांधण्याचे ठरले. मात्र, त्या जागेस ग्रामस्थांनी विरोध केला.

या जागेवर कान्होबाची यात्रा भरते म्हणून या जागेस विरोध झाला. या सर्व प्रक्रियेमध्ये 7 वर्षे निघून गेली. तरीही भटक्या विमुक्तांसाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. जोपर्यंत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे बांधकाम खर्डा येथे सुरू होत नाही. तोपर्यंत ही बिर्‍हाड पदयात्रा थांबणार नाही. नगर येथे धरणे आंदोलन करूनही प्रश्न न सुटल्यास पुढे ही बिर्‍हाड पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासा समोर जाऊन आंदोलन करील, असे सांगितले आहे. या काळात भटके विमुक्त समाजातील कुटुंबांनचे काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनावर राहील, असेही निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

प्रशासनाकडून खोटी आश्वासने

विसाहत योजनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव यांनी सात वर्षांत जामखेड तहसील कार्यालय, पंचायत समिती, आमदार रोहित पवार आदींकडे संपर्क केला. तसेच, खर्डा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे अनेक वेळा आंदोलनेही केली. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी प्रशासनाकडून फक्त खोटी आश्वासने मिळाली. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही.

असा असेल पदयात्रेचा मार्ग

31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीतर्फे खर्डा येथील मदारी समाजाचे 20 कुटुंब 28 ऑगस्टपासून बिर्‍हाड पदयात्रा काढणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी खर्डा ते जामखेड, 29 ऑगस्ट रोजी जामखेड ते कडा फॅक्ट्री, 30 ऑगस्ट कडा फॅक्टरी ते चिचोंडी पाटील, 31 ऑगस्ट या भटक्या विमुक्त दिनी बिर्‍हाड पदयात्रा नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार.

जागेचे घोंगडे भिजतच!

2016 मध्ये जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बाजार तळावरील पालात राहणार्‍या मदारी समाजाच्या 20 कुटुंबांना राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेस मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी लागणारा निधीही संबंधित खात्याकडे वर्ग झाला होता. यानंतर खर्डा येथील वसाहतीची जागाही निश्चित करण्यात आली; मात्र पहिल्या जागेमध्ये उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारा असल्यामुळे ही जागा रद्द करण्यात आली.

निवेदनावर यांच्या स्वाक्षर्‍या

निवेदनावर अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिष पारवे, जिल्हा संघटक भीमराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, लोकाधिकारचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, खरा येथील हुसेन मदारी, सलीम मदारी, मुस्तफा मदारी, सरदार मदारी, फकिरा मदारी, गणपत कराळे व द्वारका पवार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

हेही वाचा

चीनमधील इंद्रधनुष्यी डोंगर

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू : शिक्षणमंत्री दीपक केसरकर

पोलंडमधील प्राचीन दफनभूमीत सापडले चांदीचे दागिने

Back to top button