नगर : राहाता तालुक्यात टाकले दोन ठिकाणी छापे | पुढारी

नगर : राहाता तालुक्यात टाकले दोन ठिकाणी छापे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या महिनाभरापासून अज्ञातवासात असलेली दूध भेसळखोरी रोखणारी जिल्हा दुग्धतपासणी समिती कालपासून पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसले. काल राहाता तालुक्यातील दोन दूध केंद्रांवर या पथकाने छापे टाकून दुधाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. संबंधित नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याचे समजते. जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापत केलेली आहे. मात्र या समितीने महिनाभरापासून कारवाई केली नसल्याकडे ‘पुढारी’ने लक्ष वेधले. त्यानंतर दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर, अन्न प्रशासनाचे आर. बडे आदींनी मंगळवारी नांदुर्खी शिवारातील दोन दूध केंद्रांवर तपासणी मोहीम राबविली. यावेळी तेथील नमुने घेण्यात आले असल्याचे समजले.

समितीची स्वःखर्चातून मोहीम!
शासनाने समिती नेमली. मात्र या समितीला ना वाहन दिले, ना चालक. त्यामुळे ही समिती कारवाईसाठी खासगी वाहनातून जात असल्याचे समजते. याशिवाय डॉ. गारुडकर यांच्याकडे पशुधन विकास अधिकारी ही जबाबदारी असताना त्यांच्यावर समितीचे सचिव म्हणून दुग्धव्यवसाय विकास अधिकारी ही अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मनुष्यबळाच्या विषयावरही शासनाचे लक्ष देण्याची गरज आहे.

40 लिटरचा कॅन अन् दूध 10 लिटर!
शेवगाव तालुक्यातील एका गावात एका डेअरीचालकाकडे गायी कमी असताना तो 40 लिटरच्या दोन कॅनमधून स्वतःच्या डेअरीला दूध आणत असल्याची खबर अन्न प्रशासनाला मिळाली. त्यानुसार, डेअरी चालकाकडे सापळा लावला. मात्र त्याने कॅन दोन असले तरी यात प्रत्येकी 10 लिटरच दूध असल्याचे दाखविले. शिवाय आपल्या घरी एक म्हैस, दोन गायी असल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी रिकाम्या हाताने परत आले. मात्र दोन कॅनमध्ये 10-10 लिटर दूध का नेले जात होते, याविषयी वेगवेगळ्या चर्चा आजही सुरू आहेत.

Back to top button