पिंपरी : जिल्हा रुग्णालयात मिळणार मोफत उपचार | पुढारी

पिंपरी : जिल्हा रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात येत्या मंगळवारपासून (दि. 15) सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते.

यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळणार आहेत. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क वगळून शासकीय रुग्णालयांमधून करण्यात येणार्‍या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा निःशुल्क करण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा रुग्णालयात लवकरच निःशुल्क वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी या सेवेसाठी शासकीय दरानुसार शुल्क आकारले जात होते.

– डॉ. वर्षा डोईफोडे,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा

वेगळी भूमिका घेणार्‍यांचीही भूमिका बदलू शकते : खा. शरद पवार

नाशिक : विडी कामगारनगरला चार लाखांचा गुटखा जप्त

चर्‍होली फाटा येथे बेशिस्त पार्किंग; वाहतुकीस अडथळा

Back to top button