नगर : पुढारी वृत्तसेवा : कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांनी मुलगा व मुलगी जन्माच्या अनुषंगाने कीर्तनात केलेले वक्तव्य हे पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध खटला चालविण्याचा आदेश दिला असून, या खटल्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती अंनिसच्या राज्य सरचिटणीस अॅड. रंजना गवांदे-पगार यांनी दिली. इंदोरीकरांनी संगमनेर, शेलाद (ता. अकोले), उरण (जि. रायगड), बीड या ठिकाणी जाहीर कीर्तनात मुलगा आणि मुलगी जन्माच्या अनुषंगाने अशास्त्रीय आणि बेकायदेशीर वक्तव्य केले होते.
या कीर्तनाचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले होते. हेे वक्तव्य महिलांची मानहानी आणि गर्भधारणापूर्व ते प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे (पीसीपीएनडीटी) उल्लंघन करणारे आहे. इंदोरीकराच्या वक्तव्याच्या अनुषंगाने पुरावे आणि सातत्याने पाठपुरावा केल्याने संगमनेर येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. हा खटला रद्द करण्यासाठी ते जिल्हा सत्र न्यायालयात गेले होते. जिल्हा न्यायालयाने खटला रद्द केला. त्याविरोधात अंनिसने उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. उच्च न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयातील खटला चालविण्याचा निर्णय योग ठरविला होता. त्याविरोधात इंदोरीकर हे सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने खटला चालविण्याचा आदेश दिला. या प्रसंगी अंनिसचे पदाधिकारी बाबा आरगडे, प्रमोद भारूळे, विनायक सापा, डॉ. प्रकाश गरूड आदी उपस्थित होते.
हेही वाचा :