शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल साडेतेरा कोटींची फसवणूक | पुढारी

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल साडेतेरा कोटींची फसवणूक

नगर : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तब्बल तेरा कोटी ४९ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार नगर शहरात समोर आला आहे. कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिण्याला पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. ठकबाजांनी पैसे परत करण्यास नकार देत गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया (वय ३६, रा. देना बँक कॉलनी, सावेडी रस्ता, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे व निहाल बाळासाहेब काळे (सर्व रा. रूपमाता नगर, सावेडी, अहमदनगर) या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना वेळोवेळी बँक खात्यावर व रोख रकमेत साडेतेरा कोटी रुपये दिले. गुन्हा दाखल झालेल्या संशयित ठकबाजांनी शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी इडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवित ही फसवणूक केली. या आमिषाला बळी पडत तक्रारदार यांनी २०२१ ते ऑक्टोंबर २०२२ दरम्यान तब्बल १३ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणुक केली.

मात्र, गुंतवणुकीनंतर पाच टक्के परताव्याची रक्कम काही महिन्यांनी देणे बंद केल्याने तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. तेव्हा ‘आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही डबघाईला गेलो आहोत’, असे सांगून गुंतवणुकीची रक्कम परत देण्यास साफ नकार दिला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर करीत आहेत.

हेही वाचा :

मजूर संस्थांची मर्यादा 30 लाखांपर्यंत वाढवा : आमदार नीलेश लंके

कोरेगाव पार्क : आदिवासी संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा

Back to top button