घोषणांनी दुमदुमले नगर ! हिंदू समाजाचा विराट मोर्चा | पुढारी

घोषणांनी दुमदुमले नगर ! हिंदू समाजाचा विराट मोर्चा

नगर : पुढारी वृत्तसेवा : ना नेता ना नेतृत्व, केवळ सकल हिंदू समाजाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान करणार्‍याच्या निषेधार्थ शहरातून बुधवारी (दि. 9) विराट मोर्चा निघाला. माळीवाडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून निषेध मोर्चा सुरू झाला. दिल्ली गेट येथे जमलेल्या विराट हिंदू समाजाला लव्ह जिहाद विरोधी समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडगे, संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी संबोधित केले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यापुढे अवमानकारक विधाने केल्यास आम्ही शांत राहणार नाही. त्यानंतरच्या परिणामांना शासन जबाबदार राहील, अशा शब्दांत गजू घोडके यांनी प्रहार केला. घोडगे पुढे म्हणाले, हिंदू राष्ट्रनिर्माणाच्या वल्गना केल्या जातात मात्र, आज मोर्चा सहभागी झालेला हा प्रचंड जनसमुदाय पाहून हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झाले आहे. लव्ह जिहाद करून अनेक मुलींना पळवून नेले जाते. त्या विरोधात लव्ह जिहाद-बेटी बचाव समिती काम करते. त्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे मोर्चे काढले जातात. परंतु, हा संघर्ष आता इथेच थांबणार नाही. आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. आपल्या मुलांना जरूर शिक्षण द्या, परंतु त्यांना छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे हेही कळू द्या.

मोर्चामध्ये अठरापगड जातीचे समाजबांधव भगव्या झेंड्याखाली एकत्र आले, हीच तर शिवरायांच्या स्वराज्याची खासियत होती. पोलिस दलाने त्यांचे काम केले नाही तर आपल्याला रस्त्यावर येऊन कामगिरी करावी लागेल. त्यासाठी प्रत्येकाने सजग राहायला पाहिजे. लव्ह जिहाद विरोधात कायदा झालाच पाहिजे.

शिरीष महाराज मोरे म्हणाले, ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आपण आपली कामगिरी बजावली पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जो औरंगजेब स्वतःच्या बापाचा, भावाचा, बहिणीचा झाला नाही, तो औरंगजेब तुमचा कसा होईल, याचा जरा ह्यांनी शोध घेतला पाहिजे. भगवी पताका व निषेधाचा फ्लेक्स घेऊन चालणार्‍या रणरागिणी आणि त्यांच्या मागे तरुण मंडळी अशी मोर्चाचे स्वरूप होते. मोर्चात पहिल्या रांगेत चालणारे कोणत्याच पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. तसेच कोणत्याच पक्षाचे पदाधिकारीही नव्हते. मोर्चामध्ये वीस ते पंचविशीतील तरुणांची प्रचंड गर्दी होती. त्या तरुणांच्या चेहर्‍यावर संतापाच्या तीव्र भावना दिसत होत्या. तरुणांबरोबर शाळकरी मुलेही मोर्चात सहभागी झाले होते.

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे व संदीप मिटके, कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मधुकर साळवे आदी पोलिस अधिकार्‍यांनी मोर्चासाठी बेस्ट नियोजन केले होते. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त, मोर्चाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले होते.

मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद
मोर्चाचे एक टोक छत्रपतींच्या पुतळ्याजवळ तर दुसरे टोक माणिक चौकात एवढी हिंदू समाजबांधवांची गर्दी मोर्चासाठी जमली होती. मोर्चा संपेपर्यंत जुना कापड बाजार, कापड बाजार, माळीवाडा परिसरातील सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.

इमारतींवर चढून घोषणाबाजी
दिल्ली गेट येथे पोहोचल्यानंतर दिल्ली गेटपासून तर नीलक्रांती चौकापर्यंत आणि दिल्ली गेटपासून तर बाग रोजा हाडको चौकापर्यंत अशी अलोट गर्दी जमली होती. अनेक इमारतीच्या गच्चीवर महिला, तरुणांची गर्दी होती. जय श्रीराम, जय भवानी-जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी दिल्ली गेट परिसर दणाणून गेला होता.

राजकीय नेत्यांना नो इंट्री
सकल हिंदू समाजबांधवांच्या मोर्चामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), रिपाइं, आंबेडकरी विचारांच्या संघटनांचे पदाधिकारी, हिंदू समाजाच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या प्रारंभी आणि व्यासपीठावर कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला एंट्री नव्हती. मोर्चातील स्वयंसेवक वारंवार घोषणा करत होते, की कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने पुढे येऊ नये. त्यांनी मोर्चात पाठीमागे चालावे. दिल्ली गेट येथे राजकीय पक्षाचे नेते एका बाजूला बसलेले होते.

हेही वाचा :

Stock Market Updates | RBI च्या पतधोरण निर्णयानंतर सेन्सेक्स ४५० अंकांनी कोसळला, जाणून घ्या कारण

खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण; शिंदे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

Back to top button