महाराष्ट्रात ‘आयाराम- गयाराम’चे राजकारण : डॉ. प्रकाश आंबेडकर | पुढारी

महाराष्ट्रात ‘आयाराम- गयाराम’चे राजकारण : डॉ. प्रकाश आंबेडकर

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रात सध्या ‘आयाराम-गयाराम’ चे राजकारण सुरू आहे. या राजकारणाला सर्वच जनता वैताल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. श्रीरामपूर येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर चौफेर टीका सुरू आहे. तसेच केंद्रातील सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर विविध प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. या कारवायांच्या फटका महाराष्ट्रात सरकारला बसणार असून, आगामी होणार्‍या विधान सभेच्या निवडणुकीत चित्र पालटण्याची शक्यता आहे. केंद्रातही अशीच काही परिस्थितीती आहे. हिंदी बहूल प्रदेश हे काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला याचा फायदा होवू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सध्यातरी समन्वय नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या पक्षांसमवेत बहुजन आघाडी जाणे सध्या तरी शक्य नाही. आम्ही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत आहोत, असे ते म्हणाले. केंद्राच्या नाबार्ड योजनेमध्ये झालेल्या 48 कोटींच्या गैरकारभारावर ते म्हणाले, ही केंद्राची योजना आहे. त्यामुळे याची चौकशी होणारचं आहे. कोणाचेही सरकार आले तरी याची चौकशी होणार आहे. याबाबत काहींची चौकशी झाली. सध्या ती थांबली असली तरी भविष्यात चौकशी होणारच आहे. यामुळे यातून कोणाचीही सुटका होऊ शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

सध्या भारतीय जनता पक्षाचे नेटवर्क चांगले असल्यामुळे त्यांच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहचत आहेत. असेच नेटवर्क इतर पक्षांनीही ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात पाय पसरवित असलेल्या बीआरएस पक्षाबाबत भूमिका मांडताना डॉ. आंबेडकर म्हणाले, तेलंगणा राज्य हे पहिले ड्रायझोन म्हणून परिचित होते, परंतु केसीआर सरकार सत्तेवर आल्यावर पाणी उपलब्ध केले. यामुळे तेथे वर्षात तीन पीके निघतात. पिकास हमी भाव सरकार देते, हे पडसाद शेजारील महाराष्ट्रात पडण्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधींनी ‘इंडिया’ चा प्रवक्ता होऊ नये
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यास काहीही अडचण नाही, परंतु त्यांनी ‘इंडिया’ चे प्रवक्ता होवू नये. पंतप्रधान पदावर असताना वक्तव्य करण्यास अडचणी येतात. त्यामुळे त्यांनी तेजस्वी यादव यांच्यासारख्या व्यक्तीला प्रवक्ता करावे, जेणेकरून ‘इंडिया’ ची बाजू ते प्रभाविपणे मांडू शकतात, असे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर विचित्र अपघात; एक जण जागीच ठार

आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार; सुनावणीत जाणार तीन महिने

Back to top button