सॅनिटरी नॅपकीनमुळे फुटली खुनाला वाचा ! आरोपी पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

सॅनिटरी नॅपकीनमुळे फुटली खुनाला वाचा ! आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

नगर /अकोले : पुढारी वृत्तसेवा : मामा-भाच्याने मिळून तिचा गळा आवळून खून केला. मृतदेह राजूरच्या निर्जनस्थळी टाकून पळ काढला. परंतु पोलिसांनी मृतदेहानजीक सापडलेल्या सॅनिटरी नॅपकीनवरून खुनाच्या गुन्ह्याची उकल केली. व्हॉटस्अ‍ॅपच्या मदतीने तिची ओळखही पटविली. मृत महिला ही राहुरी तालुक्यातील वांबोरीची असून पोलिसांनी तिच्या पती व भाच्याला अटक केली आहे. कल्याणी महेश जाधव (रा. वांबोरी) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती महेश जनार्दन जाधव (वय 31) आणि भाचा मयूर अशोक साळवे (दोघेही रा. वांबोरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळविले.

महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कातळपूर येथे पोहोचले. मृत महिलेच्या अंगावरील कपडे, दागिने व घटनास्थळी सापडलेले सॅण्डल, पर्स या आधारे तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पर्समधील सॅनिटरी नॅपकीनचे बारकाईने निरीक्षण करता ‘वैद्यसृष्टी सॅनिटरी नॅपकीन, जिल्हा परिषद, अहमदनगर यांचे वापरा करिता’ असा मजकूर लिहिलेले गुलाबी पाकिट/रॅपर पोलिसांच्या नजरेत आले. जिल्हा परिषदेशी संपर्क साधत नॅपकीनची माहिती काढली. हे नॅपकीन अंगणवाडी सेविकांना दिले जातात. त्या अनुसूचित जातीच्या महिलांना देतात, अशी माहिती हाती आली.

महिला पोलिसांच्या मदतीने मृत महिलेचे फोटो सेविकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले असता मृत महिलेचे नाव कल्याणी जाधव असल्याचे पोलिसांना समजले. पोलिस तत्काळ वांबोरीत पोहोचले. कल्याणी जाधव यांचा शोध सुरू केला. कल्याणी या 4 ऑगस्टला दुपारी पांढरीपूल येथून बेपत्ता झाल्याचे समजले. सोनई पोलिसांत तशी नोंदही आढळून आली. मृत महिला व सोनई येथील मिसिंगमधील महिलांचे वर्णन मिळतेजुळते असल्याचे निदर्शनास येताच बेपत्ता कल्याणी हिच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. तिचा पती महेश जाधव व भाचा मयूर साळवे यांच्या माहितीत तफावत समोर आल्याने पोलिसांचा संशय बळावला. खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पिकनिकसाठी नेले भंडारदर्‍याला
पिकनिकचा बहाणा करत कल्याणीला पती महेश व भाचा मयूर यांनी भंडारदरा येथे नेले. चारित्र्याच्या संशयावरून पतीने भाच्याच्या मदतीने गळा आवळून खून केला. मृतदेह निर्जनस्थळी टाकत तेथून पळ काढला. पण पोलिसांच्या नजरेतून आरोपी सुटले नाहीत.

अज्ञाताविरोधात होता गुन्हा
5 ऑगस्टला राजूरच्या कातळपूर शिवारात 20 ते 25 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. गळा आवळून तिचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. राजूरच्या निर्जनस्थळी खून झालेली महिला कोण, तिचे मारेकरी कोण? यासारख्या क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत असताना सॅनिटरी नॅपकीन पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन गेले.

यांची मेहनत फलद्रुप
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, हवालदार देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, संतोष खैरे, फुरकान शेख, रोहित येमुल, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, महिला पोलिस शिरसेना काळे, रोहिणी जाधव, ताई दराडे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे व भरत बुधवंत यांच्या पोलिस पथकाने सलग तीन दिवस या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मेहनत घेतली. ती फलद्रुप झाल्याने हा गुन्हा उघडकीस आला.

हेही वाचा :

आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार; सुनावणीत जाणार तीन महिने

विरोधकांचे राजकारण अधिक लाजिरवाणे : अमित शहा

 

Back to top button