दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू | पुढारी

दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  महावितरणच्या तालुक्यातील जेऊर कार्यालयातील गलथान कारभार सुरूच आहे. विजेच्या धक्का बसून गाय दगावल्याची घटना (दि. 4 ) चापेवाडी शिवारात घडली. चापेवाडी शिवारातील रस्त्याच्या कडेला गुंडाळून ठेवलेल्या तारांमध्ये करंट उतरला होता. शेतकरी गोरक्षनाथ नानाभाऊ तोडमल जनावरे चारण्यासाठी जात असताना गायीचा तारेला धक्का लागताच तिचा मृत्यू झाला. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तारा पडल्या होत्या. त्याच रस्त्याने शाळेतील चिमुकले, तसेच नागरिक ये-जा करतात.महावितरण कर्मचार्‍यांना गांभीर्य नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. मृत गायीचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी केले.

पंधरा दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयातच विजेचा शॉक लागून एका बावीस वर्षीय बाह्यस्रोत कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. तसेच यापूर्वी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने कर्मचारी जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी रमेश लक्ष्मण पवार यांच्या गायीला विजेचा शॉक लागला. परंतु सुदैवाने गाय वाचली.याच ठिकाणी गोरक्षनाथ तोडमल यांची गाभण गाय दगावली. घटनेनंतर नागरिकांनी संबंधितांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वच फोन बंद होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना गाय दगावल्याची घटना समजताच त्यांनी महावितरण अधिकार्‍यांशी चर्चा केली. तत्काळ पंचनामा करून संबंधित शेतकर्‍याला आर्थिक मदत देण्याबाबत सूचना केली.

पंचनामा होतो, परंतु मदत नाही
जेऊर परिसरात तीन वर्षांपूर्वी बाबासाहेब पोपट म्हस्के यांचा बैल विजेच्या धक्क्याने मृत्यू दगावला होता. तसेच विकास म्हस्के यांची गाय गत वर्षी विजेच्या धक्क्यानेे मृत्यू पावली होती. दोन्ही घटनांचा पंचनामा झाला. परंतु मदत मिळाली नाही. त्यामुळे पंचनाम्याचा फार्स न करता अशा घटनांमध्ये तात्काळ मदत मिळण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा :

छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर, पोलिसांवर जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

पुणे स्टेशन परिसरातील टोळीवर मोक्का कारवाई

Back to top button