नगर : व्यावसायिकांना रस्त्यात अडवून लुटले | पुढारी

नगर : व्यावसायिकांना रस्त्यात अडवून लुटले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील दुकानदारांना वेफर्स, चिप्स, अगरबत्ती पुडे व इतर माल पुरविणार्‍या पिकअप चालकाला रस्त्यात अडवून चाकू व लोखंडी रॉडने मारहाण करून लुटण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.2) सायंकाळी नगर-सोलापूर महामार्गावर वाटेफळ गावच्या शिवारात असलेल्या पुलाजवळ घडली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत सुशांत रमेश जंजिरे (वय 23, रा.हातवळण देवीचे, ता.नगर), संतोष पुंडलिक खिलारे (रा.येळेगाव तुकाराम, ता. कळंबोली, जि. हिंगोली), रमेश जंजिरे, मुकुंद जंजिरे (दोघे रा. हातवळण, ता.नगर) हे चौघे जखमी झाले आहेत. याबाबत सुशांत जंजिरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

सुशांत जंजिरे यांचा ग्रामीण भागातील दुकानदारांना वेफर्स, चिप्स, अगरबत्ती पुडे व इतर माल पुरविण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी ते एका सहकार्‍या समवेत पिकअप गाडी घेऊन लोणी सय्यदमीर (ता.आष्टी) येथे गेले होते. तेथून दुपारी परत येत असताना दोघांनी त्यांना अडवून वेफर्स, चिप्स देण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी सुट्टे पुडे नाहीत. संपूर्ण पुड्यांचे पॅकेट घ्यावे लागेल, असे सांगितले. त्याचा राग आल्याने या दोघांनी शिवीगाळ करत जंजिरे यांच्या गळ्यात अडकविलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जंजिरे यांनी प्रसंगावधान दाखवत पिकअप गाडी जोरात वाटेफळच्या दिशेने पळविली. त्यावेळी या दोघांनी मोटारसायकलवर पिकअपचा पाठलाग सुरू केला. पिकअप वाटेफळजवळ आल्यावर त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी रस्त्यातच पिकअपला दुसरे वाहन आडवे लावून त्यांना अडविले. चौघांनी जंजिरे व त्यांचा कामगार या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी जंजिरे यांचे वडील व चुलत भाऊ तेथे आले. त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यातील एकाने चाकू काढत जंजिरे व त्यांच्या साथीदारावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. तर, दोघांना लोखंडी रॉडने व दगडाने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चौघे जण जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी जंजिरे यांच्या कडील बॅगमध्ये असलेले 13 हजार 650 रूपये पळवून नेले. याबाबत सुशांत रमेश जंजिरे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी भवानी पवार (पूर्ण नाव माहित नाही), सागर वाळके (पूर्ण नाव माहित नाही), शुभम मोकळे (पूर्ण नाव माहित नाही), शुभम उर्फ बाबू चौधरी (पूर्ण नाव गाव माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग हे करीत आहेत.

हेही वाचा :

रविकांत तुपकर यांची पुन्हा वेगळी चूल?

महिलांमध्ये गर्भाशयातील गाठींचा त्रास वाढतोय

Back to top button