भिडे गुरुजींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा! शिर्डी विकास आघाडीचा थेट पोलिस ठाण्यात मोर्चा | पुढारी

भिडे गुरुजींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा! शिर्डी विकास आघाडीचा थेट पोलिस ठाण्यात मोर्चा

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा: मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे गुरुजींविरुद्ध भारतीय दंड संहिता व रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करावा, यासह देशद्रोह, दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखविणे, राष्ट्रीय महापुरुष व संतांच्याविषयी अपशब्द वापरणे व शिवराळ भाषेचा उपयोग करणे, याकडे दुर्लक्ष केले जावू नये, अशा मागण्या करीत शहरात शिर्डी विकास आघाडीच्या वतीने पोलिस ठाण्यात मोर्चा नेत निवेदन देण्यात आले. दरम्यान, या प्रकाराविषयी शिर्डी पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे.

मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे हा इसम वारंवार देशासह राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय महापुरुषांची व राष्ट्रीय संतांसह महिलांची अवहेलना करुन, बेताल वक्तव्याने दोन समाजात धर्मात तेढ निर्माण करीत आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरु आहे. यामुळे राज्यासह देशात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत आहे. संबंधित इसमाविरुद्ध भारतीय दंड संहिता व रासुका ( राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करावा, देशद्रोह,दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणे,धार्मिक भावना दुखावणे, राष्ट्रीय महापुरुष व संतांच्या विषयी अपशब्द वापरणे व शिवराळ भाषेचा उपयोग करणे तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर स्वरूपाची कारवाई करावी. सदर इसमास तातडीने अटक करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर, शहराध्यक्ष सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, अमृत गायके, सरपंच कानिफ गुंजाळ, तुषार शेजवळ, समीर शेख, संतोष वाघमारे, राजमोहम्मद शेख, योहान गायकवाड, ज्ञानेश्वर हातांगळे, विजय पवार, विशाल बर्डे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन कोते, शहरप्रमुख संजय शिंदे, सुनील परदेशी, दत्तू आसणे, अमोल गायके, सुयोग सावकारे, विश्वजीत बागुल, पुंडलिक बावके, महिला तालुकाध्यक्षा दिपाली पवार, मनसेचे शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, मनसे विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत वाकचौरे, आंबादास कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नानासाहेब काटकर, रमेश बनकर, वैभव सोनवणे, प्रवीण बनकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, तालकाध्यक्ष किरण बोर्‍हाडे, शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, किरण कदम, साई दिवे, संदेश मोरे, युवा शहराध्यक्ष आतिष शेजवळ, प्रहारचे तालुकाध्यक्ष विजय काकडे, शहराध्यक्ष अमोल बानाईत, बाबासाहेब दिवे, विकी मिसाळ, भारतीय लहुजी सेनेचे समीर वीर, शिवाजी भोंडगे, शिवा उमाप, गणेश अहिरे, योगेश कांबळे, रोहित वीर, शाहरुख शेख, रुपेश आरणे, संजय भोंडगे, तेली महासंघाचे बद्रीनाथ लोखंडे, गिरीश सोनेजी आदींसह असंख्य साईभक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय लहुजी सेना, राष्ट्रीय तेली महासंघ यासह विविध पक्षीय संघटनांचा यात सहभाग होता.

राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न आ वासून उभे आहेत. बेरोजगारी, महागाई, कृषीसह तलाठी भरतीचा गैरव्यवहार यावर विरोधी पक्षाने सरकारला घेरले आहे. आ. थोरात यांनी सरकारची प्रचंड कोंडी केली. धगधगणार्‍या मणिपूरचा विषय विधानसभेत तांडव करत आहे, सरकारला नाकी नऊ आले. यातून पळ काढण्यासाठी विरोधकांसह जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भिडेंचा वापर केला जात आहे.
                                            – सचिन चौगुले, अध्यक्ष शिर्डी काँग्रेस 

हेही वाचा :

नगर : नांदूरमधमेश्वरच्या 8 दरवाजांचा 4 तालुक्यांना फटका !

नगर : दोन तालुके जोडणारा शिवरस्ता खुला

 

Back to top button