नगर : अंगणवाडी सेविकांचे धरणे ; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष | पुढारी

नगर : अंगणवाडी सेविकांचे धरणे ; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

नगर : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवाव्यात यासाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख, सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, शोभा लांडगे, मंदा कसारा, माया जाजू, नंदा पाचपुते, अलका नगरे, संगिता विश्वास, रजनी क्षीरसागर, संगिता इंगळे, मन्नाबी शेख, अरुणा खळेकर, अलका दरंदले, सुजाता शिंदे, मंगल राऊत, प्रतिभा निकाळे, निर्मला चांदेकर, शशिकला औटी, शोभा विसपुते, सुनिता धसाळ, मंदा निकम, शकीला पठाण, सविता दरंदले, सुनिता बोरुडे, सरला राहणे, शोभा खंडागळे, नंदा राजगुरू, कुसुम भापकर, मंगल राऊत, अरुणा डांगे आदी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदरचे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदवला. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, महिला व बालकल्याण विभाग यांच्या समवेत कृती समितीची चर्चा झालेली होती. यावेळी मंत्री महोदयांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी, शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा, सेवानिवृत्तीनंतरचे थकीत एकरक्कमी लाभ तातडीने देणे यांसह प्रकल्पाशी संबंधित विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आल्याचे प्रमुख नेत्यांनी सांगितले.

Back to top button