रमाई आवास योजना : 2662 कुटुंबांना मिळणार घरटं ! | पुढारी

रमाई आवास योजना : 2662 कुटुंबांना मिळणार घरटं !

नगर : पुढारी वृत्तसेवा : रमाई आवास योजनेतून राज्यात ग्रामीण व शहरी भागातील तब्बल 1 लाख 52 हजार कुटुंबांचे घराची स्वप्ने साकार होणार आहेत. राज्य सरकारने जिल्हानिहाय उद्दिष्ट्ये दिले असून, नगर जिल्ह्यात रमाई आवासमधून 2662 घरकुले मंजूर झालेली आहेत. जिल्हा परिषद स्तरावरून लवकरच तालुकानिहाय उद्दिष्ट्ये दिली जाणार आहेत.

शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे उद्दिष्ट नुकतेच जिल्हानिहाय वितरीत करण्यात आले आहे. जिल्हानिहाय समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी 1 लाख 52 हजार 435 लाभार्थ्यांची आकडेवारी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून शासनाकडे दिली होती. शासनाने 100 टक्के उद्दिष्टास मंजुरी प्रदान केलेली आहे. 1 लाख 34 हजार 174 घरकुले ही ग्रामीण भागात तर 18261 शहरी भागात नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायती हद्दीतील लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहेत. या संदर्भातचे तसे पत्र शासनाचे अवर सचिव अ. आहिरे यांनी काढले आहे.

जिल्हानिहाय घरकुल उद्दिष्ट्ये
मातंगसमाज व अनुसुचित जाती व नवबौद्ध घटक यांना रमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ दिला जातो. राज्यात मातंग समाजासाठी 27949, तर अ.जा व नवबौद्धांसाठी 1 लाख 24 हजार 486 घरकुले मंजूर आहेत. नगर जिल्ह्यात मातंग समाजासाठी 362, तर अ.जा व नवबौद्धांसाठी 2278 असे एकूण 2640 घरकुले मंजूर झालेली आहेत.

दीड लाखांचे अनुदान
घरकुलासाठी 1 लाख 20 हजार अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यात 12 हजार शौचालय अनुदान आणि रोजगार हमी योजनेतून 18 असे दीड लाखांचे अनुदान दिले जाते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. तालुकानिहाय उद्दीष्ट्ये जिल्हा ग्रामीण विकास योजनेतूनच दिले जाते.

रमाई आवास योजनेतून जिल्ह्यासाठी 2640 घरकुलांचे उद्दिष्ट्ये मिळालेले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना खाली राबविली जात असून, यातून निश्चितीच लाभार्थ्यांची घराची स्वप्ने साकार होणार आहेत.
                            – राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण

Back to top button