अहमदनगरमध्ये पुन्हा चाकू हल्ला..! कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा | पुढारी

अहमदनगरमध्ये पुन्हा चाकू हल्ला..! कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : ओंकार भागानगरे, अंकुश चत्तर हत्याकांडानंतर शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्तोरस्ती पोलिस गस्त सुरू आहे. तरीही शहरात रक्तपाताच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी चाणक्य चौकात दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून फ्रान्सिस विलास उबाळे (रा.पंचशीलवाडी, अहमदनगर) या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. कायद्याचा धाक संपला की पोलिसांचा वचक, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून, नगरकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

चाणक्य चौकात घडलेल्या या घटनेनंतर पोलिस यंत्रणांनी धावपळ करत चौघांना अटक केली. फ्रान्सिस विलास उबाळे (रा.पंचशीलवाडी, अहमदनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकार्‍यांचा मुलगा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
विशाल भंडारी (रा.वाकोडी रोड), शुभम धुमाळ (रा.सारसनगर), संकेत खापरे (रा.विनायकनगर), गोविंद पवार (रा.भोसले आखाडा) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. मोटरसायकलवरून जात असताना चाणक्य चौकाच्याजवळ फ्रान्सिस यांच्या दुचाकीला समोरुन येत असलेल्या अनोळखी मुलांचा धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरून फ्रान्सिस व आरोपींमध्ये वाद झाले.

त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी फ्रान्सिस यांना विटांनी मारहाण केली. विशाल भंडारे याने त्याच्याकडील छोट्या चाकूने फ्रान्सिस उबाळे यांच्या पोटावर वार केला. या झटापटीत आरोपी विशाल भंडारी हा देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळ व मनोज कचरे, शाहिद शेख, रवी टकले, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दीपक रोहोकले, नितीन शिंदे या पोलिस अंमलदारांनी आरोपींना अटक केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. नगरच्या वाढत्या गुन्हेगारीवर विधानसभेत चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. रक्तपाताच्या घटना सतत घडत आहेत. ओंकार भागानगरे या तरुणाचा महिनाभरापूर्वी तलवारीने वार करून खून करण्यात आला. तर, आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कार्यकर्ता अंकुश चत्तर यांचा खून झाला. या दोन गंभीर घटनानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. खुनी हल्ले, खून, मारामार्‍या या घटनांमुळे नगरकर दहशतीच्या छायेत वावरत आहेत. नगरकरांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून एसपी राकेश ओला स्वत: रस्त्यावर उतरले. रात्री बारापर्यंत सर्वत्र बंद झाल्यानंतरच ते विश्रांतीला जातात. तरीही चोर्‍या, खूनी हल्ले सुरूच आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

प्रभावी पोलिसिंगची गरज

कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने प्रभावी पोलिसिंग राबवणे गरजेचे असताना शहर पोलिसांकडून ते होत नसल्याचा आरोप होत आहे. गस्तीची पथके नेमूण दिलेल्या ठिकाणी हजर राहत नसल्याने भानगडबाजांचे फावत आहे. यासाठी शहर पोलिसांकडून प्रभावी गस्तीसाठी नियोजन करणे गरजेचे बनले आहे. दिवसा व रात्री ड्युटीवर असणारे पोलिस योग्य ड्युटी बजावत आहेत का, याची तपासणी होणे गरजेचे आहे.

हेही वाचा

नाशिक : गंगापूर धरण निम्मे भरले, शहरवासीयांना थोडा दिलासा

नाशिक- पुणे महामार्गावर जन-शिवनेरी सुसाट

नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

Back to top button