भरधाव कारची धडक बसून दुचाकीवरील दोन तरुण ठार | पुढारी

भरधाव कारची धडक बसून दुचाकीवरील दोन तरुण ठार

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भरधाव कारने दुचाकीस्वारास दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी (दि.22) रात्री कुकाणा-देडगाव रस्त्यावर घडली. सोमनाथ नवनाथ गाले (वय 18, रा.मिरी, ता.पाथर्डी) व प्रदीप काकासाहेब खाटिक (वय 17, रा.वडुले, ता.नेवासा) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. प्रदीप खाटीक हा मिरी येथील आपल्या मामाच्या घरी आठ ते दहा दिवसांपूर्वी गेला होता.

परंतु, त्याचा मोबाईल नादुरुस्त झाल्याने, तो दुरुस्त करण्यासाठी तो मामाचा मुलगा सोमनाथ गाले याला घेऊन दुचाकीवरून (एमएच 16 डीएफ 2486) कुकाणा येथे आला होता. मोबाईल दुरुस्त करून दोघे पुन्हा मिरी येथे जाण्यासाठी निघाले. देडगावहून कुकाण्याकडे भरधाव आलेली कार (एमएच 14 एफजी 0209) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. औषधोपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

दोन्ही युवक अविवाहित असून, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे मिरी व वडुले येथे हळहळ व्यक्त होत आहे. दोघांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवाशाचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा दुरक्षेत्राचे पोलिस नाईक तुकाराम खेडकर करत आहेत.

Back to top button