खबरदार...छेड काढणारांची धिंड काढणार ! : अध्यक्ष शिवाजी कर्डिले | पुढारी

खबरदार...छेड काढणारांची धिंड काढणार ! : अध्यक्ष शिवाजी कर्डिले

करंजी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शिक्षणासाठी बाहेरगाहून येणार्‍या मुलींची काही टवाळखोर छेड काढत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापुढे शालेय विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार झाल्यास खबरदार…गावभर धींड काढल्याशिवाय राहणार नाही, यामुळे पोलिसांनीही याची गंभीर दखल घ्यावी. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सूचक इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी छेड काढणार्‍या तरुणांसह पोलिस प्रशासनाला दिला आहे.

मंगळवारी तिसगाव येथील वृद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांच्यासह पोलिस उपाधीक्षक प्रवीण पाटील, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, माजी सभापती काशिनाथ लवांडे, पुरुषोत्तम आठरे, संस्थेचे सदस्य अरुणराव आठरे, डॉ. बाळकृष्ण मरकड, चंद्रकांत पाटील म्हस्के, माजी सदस्य सुनील परदेशी, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर कायंदे, कौशल्यनिरंजन वाघ, सरपंच इलियास शेख, विक्रमराव ससाने, सरपंच नितीन लोमटे, युवानेते मनोज ससाने, बंडू पाठक, संतोष शिंदे, धीरज मैड, दादासाहेब चोथे, सरपंच महेश लवांडे, दिलीप वांढेकर, राजेंद्र दगडखैर, सुरेश चव्हाण, अकील लवांडे, संजय लवांडे, प्रसाद देशमुख, साहेबराव गवळी, अण्णासाहेब शिंदे, बाबा पुढारी, मन्सूर पठाण, पंकज मगर, लतीफ शेख, वहाब इनामदार आदी उपस्थित होते.

तिसगावमध्ये छेडछाड होत असल्याने काही पालकांनी पाथर्डी शहरात मुलींना प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. शाळेत गेलेली मुलगी पुन्हा घरी सुरक्षित येईल की नाही, अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिसांनी छेडछाड करणार्‍या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, ही अतिक्रमणे काही चुकीच्या गोष्टी घडण्यास कारणीभूत ठरत असल्याने शाळा परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची गरज असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले.

कडक कारवाई करणार : पाटील
पोलिस उपधीक्षक प्रवीण पाटील म्हणाले, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, यापुढे तिसगावमध्ये छेडछाड करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी कारवाई पोलिस प्रशासनाकडून करण्यात येईल.

संस्थेकडे बोट करून चालणार नाही : आठरे
तिसगावमध्ये अडीच-तीन हजार विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामुळे तिसगावचा नावलौकिक झाला आहे. त्यामुळे शाळेत येणार्‍या मुला-मुलींना त्रास होणार नाही, याची दक्षता तिसगावकारांनी घेतली पाहिजे. केवळ संस्थेकडे बोट करून चालणार नाही, अशी भूमिका अरुण आठरे यांनी व्यक्त केली.

अवैध धंदे परिसरातून हद्दपार करा : लवांडे
तिसगावातील विद्यालय सुरू व्हावे यासाठी आम्ही सुरुवातीपासून सहकार्याची भूमिका घेतली; परंतु गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यातून कमवलेला पैसा आणि संपत्तीच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवली जात असून, तिसगावचे वातावरण दूषित करण्याचे काम सुरू आहे. विद्यालय परिसरात मटका, जुगार, चक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. सर्व अवैधधंदे हद्दपार केल्यानंतर टवाळखोरांचे चौकात थांबणे बंद होणार, असे काशिनाथ लवांडे म्हणाले.

Back to top button