नगर : 19 वर्षीय तरूणाच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन | पुढारी

नगर : 19 वर्षीय तरूणाच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

श्रीगोंदा/काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील समाधान अंकुश मोरे या 19 वर्षीय तरूणाच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी एरंडोली ग्रामस्थांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. समाधान मोरे याची आई रूपाली अंकुश मोरे यांच्या फिर्यादीवरून मढेवडगाव येथील दिलीप गणपत मांडे, पाडुंरग उंडे, प्रवीण दिलीप मांडे, अभि दिलीप मांडे, बाळासाहेब मांडे, अक्षय त्रिंबक मांडे, आकाश बाळासाहेब मांडे या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान मोरे हा मढेवडगाव येथील दिलीप मांडे यांच्याकडे नोव्हेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान ट्रॅक्टर चालक म्हणून कामास होता. दिलीप मांडे आणि प्रवीण मांडे हे समाधान याला ट्रॅक्टर कामाव्यतिरिक्त इतर कामे सांगत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे समाधान याने ट्रॅक्टरवरील काम सोडून घरी शेती सुरू केली. ट्रॅक्टरला चालक नसून ट्रॉली दुरूस्त करायची असल्याचे सांगत 14 जुलै रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दिलीप मांडे व पाडुरंग उंडे समाधानला घेऊन गेले. मात्र, 15 जुलै रोजी सकाळी समाधान याने फाशी घेतल्याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला देत, त्याला मढेवडगाव येथे बोलावून घेतले. समाधानचा मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला.

मात्र, समाधानचा घात केल्याचा आरोप करत मयताच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दिलीप मांडे, पांडुरंग उंडे व प्रवीण मांडे यांच्याशी यापूर्वी झालेल्या वादामुळे त्यांनी समाधान अंकुश मोरे यांस मारहाण करुन त्याचा खून करून त्याला फाशी देवून झाडाला लटकविला असल्याचा आरोप मयताची आई रूपाली मोरे यांनी केला. त्यानंतर सात जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शवविच्छेदन अहवालात तफावत
मयत समाधानचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अहवालावर नातेवाईकांनी संशय घेतल्याने, पुन्हा पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दोन्ही अहवालात मोठी तफावत असल्याने मयताच्या कुंटुंबियासह नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना धारेवर धरून ठिय्या दिला. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि एका पोलिस कर्मचार्‍यावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी केली.

हे ही वाचा :

Nashik : दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

नगर : गेवराईच्या घरफोडीचा छडा चोरट्यांचा मोबाईलच लावणार?

Back to top button