संगमनेरात फक्त 25 टक्के पेरण्या ; शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत | पुढारी

संगमनेरात फक्त 25 टक्के पेरण्या ; शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

संगमनेर शहर : शिवाजी क्षीरसागर : संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जून महिना संपून जूलैचे 15 दिवस उलटले तरी पावसाची टक्केवारी अतिशय कमी आहे. योग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळबल्या आहेत. तालुक्यात अवघ्या 25 टक्के पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी यांनी दिली. तालुक्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला होता. शिवाय अवकाळी पावसाने वर्षभर हजरी लावल्याने पाण्याची पातळी समाधान कारक होती. यामुळे पिके चांगली बहरली होती. चालू वर्षीही अशाच अनुभवाची प्रतिक्षा असताना जून महिना सुरू होताच मुबलक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. खरीपाच्या शेती मशागतीच्या कामांना गती आली होती.

पेरणीसाठी वावर तयार करून पावसाची प्रतिक्षा असताना सुरूवातीलाच पावसाने उशिरा हजेरी लावली. यामुळे अंदाज चुकल्याने शेतकरी आजही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यात बहुतांश शेती पावसावर अवलबून आहे. यामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांना खरीप हंगाम महत्वाचा आहे, पण यंदा पाऊस लांबल्याने चिंतेचे वातावरण असून, दुष्काळाची भिती व्यक्त केली जात आहे.

मागिल वर्षी ऊस व कांदा सोडून खरिपाची 59 हजार 997 हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. यात भात, बाजरी, मका, तृणधान्य 30105 हेक्टर , भुईमुग , सोयाबीन 25975 हेक्टर तर कापुस 2145 हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. ऊसाचे क्षेत्र 1500 हेक्टर तर काद्दाचे क्षेत्र 1447 होते. मागिल वर्ष समाधान कारक जात असताना यंदा पाऊस लाबल्याने पेरण्या खोळबल्या आहेत.
जून महिन्यात 37.3 मिमी तर 9 जूलै पर्यंत 19.7 मिमी पाऊस पडला. यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही. जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या, पण पावसाने पाठ फिरविल्याने अंदाज चुकले.

यंदा खरिप हंगाम अडचणीत सापडला आहे. पेरण्या उशिरा झाल्या तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. यंदाच्या खरिपाचा विचार करता कृषी विभागाने अंदाज वर्तविला आहे. भात बाजरी व मका क्षेत्र 30993 हेक्टर, तूर मूग व उडीद 484 हेक्टर, भूईमुग व सोयाबीन 22776 हेक्टर, कापुस 230 हेक्टर , ऊस 3200 हेक्टर तर कांदा 1120 हेक्टवर लागवडीचा अंदाज आहे. यात परिस्थितीनुसार चढ- उतार होतो.

यंदा ऊस क्षेत्र वाढले तर कांदा, भुईमुग व सोयाबीन क्षेत्र मात्र घटले आहे. कडधान्य पिकाचे क्षेत्रही हळू-हळू कमी होत असून, भाजीपाला पिकाकडे शेतकरी वळत आहे. भंडरदरा व निळवंडे धरण क्षेत्रात पाऊस चांगला होत असल्याचे दिलास दायक चित्र आहे. नोव्हेबर 2023 अखेर पाटाचे पाणी देण्याचे नियोजन असल्याने दुष्काळी भागाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाळी शेती करणारा शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने डोळे वटारले आहे. परिणामी शेती पिकेधोक्यात आल्याने बळीराजापुढे आणखी एक नवे संकट उभे राहिल्याची बिकट परिस्थिती दिसत आहे.

हे ही वाचा :

नगर : जमीन मोजणीस आलेल्या अधिकार्‍यांना पिटाळले..!

Ajit Pawar Group Meet Sharad Pawar : मोठी बातमी; अजित पवारांसह गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Back to top button