चौंडी जिल्हा परिषद शाळेला निधी सरकारने मंजूर केला : आमदार प्रा. राम शिंदे | पुढारी

चौंडी जिल्हा परिषद शाळेला निधी सरकारने मंजूर केला : आमदार प्रा. राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी दोन कोटी तीन लाख 43 हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांशी संबंधित 10 ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती. तसेच, विधीमंडळ सदस्याच्या मागणीच्या अनुषंगाने यात तीन ऐतिहासिक गावांचा समावेश करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील गाभा समितीने या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली होती. यानंतर मुख्य अभियंता (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सरकारने या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आला आहे.

आमदार प्रा.राम शिंदेंचा पाठपूरावा
चौंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयाचे राज्यातून कौतूक होत आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे चोंडी शाळेला भरीव निधी मंजूर झाला आहे. चोंडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Back to top button