वडिलांचा मर्डर करण्यासाठी पोलिसांची मदत हवी..! | पुढारी

वडिलांचा मर्डर करण्यासाठी पोलिसांची मदत हवी..!

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : वडिलांचा मर्डर करण्यासाठी पोलिसांची मदत हवी आहे, असा डायल 112 वर खोटा कॉल करून दिशाभूल केल्याप्रकरणी तरूणावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश बबन खेडकर (वय 28, रा. चिंचपूर ईजदे, ता. पाथर्डी) असे या तरूणाचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांना गुरूवारी (दि.13) रात्री 12.50 वाजता डायल 112 वर कॉल आला की, मी कॉलर बोलत आहेत. मी माझ्या वडिलांचा मर्डर करणार आहे. त्यासाठी पोलिसांची मदत हवी आहे.

त्यावेळी कॉन्स्टेबल शेळके यांनी सहकार्‍यांसह चिंचपूर इजदे येथे जाऊन आलेल्या फोनवर कॉल केला असता, प्रथम खेडकर याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खेडकर यांचा शोध घेतला असता, तो गावाच्या हनुमान मंदिराजवळ सापडला. खेडकर याने दारूच्या नशेत 112 ला कॉल केल्याचे सांगितले. पोलिसांनी गणेश खेडकर याच्या आई-वडिलांना बोलावून त्याने पोलिसांना कॉल करून वडिलांचा मर्डर करणार असल्याचे सांगितल्याची माहिती दिली. त्यावेळी गणेशच्या आई-वडिलांनी तसा कसलाही प्रकार नसल्याचे सांगितले. पोलिसांची डायल 112 प्रणाली ही नागरिकांच्या सोयीसाठी केलेली असताना, त्याचा दुरुपयोग करून पोलिसांची दिशाभूल केल्याने कॉन्स्टेबल शेळके यांच्या फिर्यादीवरून गणेश खेडकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button