कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : शासनाकडून मिळणार्या कांदा अनुदानासाठी अपात्र शेतकर्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना तत्काळ अनुदान द्यावे. शासनाने शेतकर्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली, परंतु या योजनेचे अर्ज भरण्यास कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालक शेतकर्यांकडे जास्त 100-150 रुपये मागतात. हा प्रकार थांबवावा. कांदा अनुदान व पीक विम्यासाठी शेतकर्यांना वेठीस धरू नये, अशी आग्रही मागणी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी तहसीलदारांकडे केली.
मतदार संघातील जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात समस्या निवारण बैठक पार पडली. यावेळी पाणी, रस्ते, वीज, स्मशानभूमी, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना अनुदान, घरकुल, रेशनकार्ड ऑनलाईन करणे, समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा, संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे आदी महत्त्वाचे प्रश्न कोल्हे यांनी मांडले. तहसीलदार संदीप भोसले यांनी या प्रश्नांवर लवकर कार्यवाही करु, असे सांगितले. प्रारंभी कोल्हे यांनी नूतन तहसीलदार भोसले यांचा सत्कार केला.
यावेळी ग. वि. अधिकारी सचिन सूर्यवंशी, भूमी अभिलेखचे भास्कर, महावितरण अभियंता किशोर घुमरे, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते, सुनील देवकर, कारवाडीचे मारूती लोंढे, शिंगणापूरचे सरपंच डॉ. विजय काळे, धारणगावचे दीपक चौधरी, वेळापूरचे सरपंच सतीश बोरावके, देर्डे चांदवडचे डॉ. नानासाहेब होन, कैलास रहाणे, बाबासाहेब नेहे, कानिफ गुंजाळ, आनंद शिंदे, किसनराव पवार, राजेंद्र बढे, कचेश्वर माळी, खोपडीचे सरपंच जयराम वारकर, सोपानराव देठे, मारुती देठे, रामराव देठे, कचरु भाटे, मनोज थोरात, दत्तात्रय टुपके, उक्कडगावचे दादासाहेब निकम, दत्तात्रय निकम, अतुल सुरळकर, किशोर साळुंखे, भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मण वाकचौरे, रवींद्र सोळसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विवेक कोल्हे म्हणाले, जनतेच्या विविध प्रश्नांसाठी 9 मे रोजी आम्ही विराट मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. तेव्हापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास दर महिन्याला तहसील कार्यालयात समस्या निवारण बैठक घेत पाठपुरावा करतो, असे सांगत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जनता दरबार, समन्वय समितीची नियमित बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. त्यांचा प्रशासकीय अधिकार्यांवर वचक नाही. शासकीय अधिकारी, कर्मचारी मनमानी करतात. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेचे छोटे-छोटे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत, असा आरोप कोल्हे यांनी केला.
कोपरगाव तालक्यात अनेक शेतकर्यांचे कांदा अनुदान प्रस्ताव अपात्र ठरवले. शासनाने कसलीही अट न लावता त्रिसदस्यीय समितीचा कांदा नोंद असल्याचा दाखला ग्राह्य धरुन, अनुदानास अपात्र शेतकर्यांना पात्र ठरवून प्रस्ताव मंजूर करावे. पोहेगाव व सुरेगाव या दोन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली; परंतु रवंदे, कोपरगाव, दहेगाव बोलका व कोकमठाण सर्कलमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत मिळाली नाही. ती त्वरित द्यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली.
संजय गांधी निराधार योजनेचे 448 लाभधारकांचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मंजूर करावे. घारी व डाऊच (बु.) गावास स्वतंत्र तलाठी सजा सुरु करा, धोंडेवाडी गावास नवीन गावठाण विस्तार करावा, समृध्दी महामार्ग कामामुळे कोकमठाण, कान्हेगाव, देर्डे कोर्हाळे आदी भागात खराब झालेले रस्ते दुरुस्त करा, यासाठी एमएसआरडीसीच्या अधिकार्यांकडे यापूर्वी वारंवार पाठपुरावा करूनही रस्ते दुरुस्त झाले नसल्याचे सांगत अधिकार्यांची बैठक बोलावून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, असे कोल्हे म्हणाले.
कान्हेगाव येथे 11 मेन पोटचारी समृध्दी महामार्गाच्या कामामुळे बुजली. 2018 पासून पाठपुरावा करुनही चारीचे काम होत नाही. ते तातडीने करा, कान्हेगाव, भाकरे वस्ती आदी ठिकाणी समृध्दीच्या उड्डाणपुलाखाली व भुयारी मार्गात पाणी साठल्याने रहदारीस रस्ता बंद पडला आहे. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, समृध्दीमुळे ग्रामीण मार्ग क्र.529 व 531 ची दुरवस्था झाल्याने रस्त्याचे त्वरित काम करा, समृध्दीवरील पावसाचे पाणी शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याने रस्त्यालगत साईड गटार काढून पाणी निचर्याची व्यवस्था करा आदी मागण्या कोल्हे यांनी मांडल्या.
प्रश्न त्वरित न सुटल्यास आंदोलन करणार..!
माजी आ. स्नेहलता कोल्हे व मी जनहिताचे प्रश्न सोडविण्यास शासन दरबारी सतत पाठपुरावा करतो. आजवर विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. या बैठकीत मांडलेले प्रश्न त्वरित न सुटल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिला.