कोळपेवाडी : जवान आहेरांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

कोळपेवाडी : जवान आहेरांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्यदलात 253 मेडिअम रेजिमेंटचे हवालदार कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील जवान दीपक कृष्णा आहेर (वय-41 वर्षे) यांचे रविवार (दि.09) रोजी अल्पशः आजाराने पुणे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात सोमवार (दि.10) रोजी कोळपेवाडी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी सकाळी पुणे येथून भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून जवान दीपक आहेर यांचे पार्थिव कोळपेवाडीच्या सरहद्दीवर आल्यानंतर माजी सैनिक दलाच्यावतीने जवान आहेर यांच्या पार्थिवास खांदा देण्यात आला. त्यांचे पार्थिव फूलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनामध्ये ठेवण्यात आले. ट्रक पुढे लाऊड स्पीकरवर लावण्यात आलेल्या ‘ऐ मेरे वतन कें लोगो.’. या गीताचे बोल ऐकून नागरिकांना शोक अनावर झाला. उपस्थितांचे डोळे पाणावले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक दिपक यांना मानवंदना देत होते.

कोळपेवाडी बाजार तळावर उभारलेल्या मंडपात दिपक यांचे पार्थिव नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. माजी आ. अशोकराव काळे, कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीप बोरनारे, भारतीय सैन्यदलाच्या वतीने नायब सुभेदार शामसुंदर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संदिपकुमार भोसले, जिल्हा माजी सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीने सुभेदार धन्यकुमार सरवदे, सुभेदार यमाजी चेहडे, कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे, तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष युवराज गांगवे, सुभेदार मारुती कोपरे, सुशांत घोडके, कोळपेवाडीचे सरपंच सुर्यभान कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन निवृत्ती कोळपे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रध्दाजंली वाहिली.

हवालदार दिपक आहेर यांचे पार्थिवावर ठेवण्यात आलेला राष्ट्रध्वज पत्नी कांचन यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. चिरंजीव साहिलने हवालदार दिपक यांचे पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. कोळपेवाडी ग्रामस्थ आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून हवालदार दिपक आहेर यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी झाले होते.

Back to top button